शिरूर,पारनेरमधील गावांना दिलासा; कुकडी कालव्यातून पाणी सोडले

43

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूरच्या बेट भागातून वाहणाऱ्या कुकडी व घोड नद्या आणि कालवे असूनही या भागातील जनतेला दुष्काळ आणि पाणींटचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भीमाशंकरचे माजी अध्यक्ष व मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी पाणीप्रश्नी केलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर यश आले आहे. पाटबंधारे विभागाने शनिवारी सकाळी कुकडी डावा कालव्यातील 44 किमी व 55किमी वरील एसकेएफमधून पाणी सोडल्याने शिरुर व पारनेर तालूक्यातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टाकळी हाजी परीसरातील कुकडी नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे गेले दोन महिन्यांपासून कोरडे पडले होते. या भागातील विहरींनीही तळ गाठल्याने या भागातील पाणी परिस्थिती बिकट झाली असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तसेच जनावारांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पाणी मिळावे म्हणून परिसरातील शेतकरी दीड महिन्यापासून पाण्यासाठी संघर्ष करीत होते. परंतु पाटबंधारे विभाग दाद देत नव्हता. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा प्रश्न देवदत्त निकम यांच्याकडे मांडला. निकम यांनी तात्काळ दखल घेत या परिसरातील सुमारे बाराशे शेतकऱ्यांसोबत कुकडी कालव्यावर दोन दिवसांपूर्वी आक्रमक आंदोलन केले होते. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. कानडे यांनी आंदोलनाची दखल घेत घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी निकम यांनी शिरुर व पारनेरच्या पाणी प्रश्नावरुन त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर कानडे यांनी दोन दिवसांत या भागातील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाने दिलेल्या शब्दाप्रमाणे या भागात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या