बोदवडमध्ये भीषण पाणीटंचाई, संतप्त महिलांची पाण्यासाठी धडक

सामना प्रतिनिधी, बोदवड

वीज बिल थकल्याने ओडीएचा वीजपुरवठा तब्बल १५ दिवसांपासून खंडित आहे. यामुळे योजनेवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यानंतर काहीच दिवसांत टंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे रोजगार बुडवून पाण्यासाठी भटकंतीची वेळ आल्याने प्रभाग ११ व १२ मधील महिलांनी बोदवड पालिका गाठून प्रचंड संताप व्यक्त केला. संतप्त महिलांनी शहरातील पाणीटंचाईची समस्या निकाली काढा, अशी मागणी यावेळी केली.

कालबाह्य झालेल्या ओडीए योजनेकरून बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यांतील ३२ गावांना अजूनही पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या योजनेतून पाणी घेणाऱ्या गावांमधून पाणीपट्टीची वसुली होत नाही. दुसरीकडे जिल्हा परिषद योजना चालवण्यासाठी म्हणजेच देखभाल दुरुस्तीसाठी असमर्थ ठरते. यामुळे गटांगळ्या खात सुरू असलेल्या योजनेचे वीजबिल वारंवार थकते. परिणामी वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ येते.

आताही वीजपुरवठा खंडित झाल्याने १५ दिवसांपासून ओडीए योजना बंद आहे. यामुळे बोदवडसह अवलंबून असलेल्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. अनेकांना तर रोजगार बुडवून निव्वळ पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बोदवड शहरातही २० दिवसांपासून पाणी नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग ११-१२मधील सुमारे ५० महिलांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता नगरपंचायतीवर मोर्चा काढला. शहरातील पाणीटंचाईची समस्या निकाली काढा, अशी मागणी प्रभारी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे केली. दुसरीकडे या टंचाईतून काहिसा दिलासा देण्यासाठी उपनगराध्यक्ष प्रभाग ११ मध्ये स्वखर्चाने पाणीपुरकठा करत असल्याचे चित्र आहे.

ओडीएचे वीजबिल दरमहिन्यात सरासरी ३० ते ३५ लाखांपर्यंत येते. मात्र, या तुलनेत ग्रामपंचायतींकडून पाणीपट्टी वसूल होत नाही. त्यामुळे सहा महिन्यांत योजनेचा वीजपुरवठा पाच वेळा खंडित झाला. दुसरीकडे बोदवड ग्रामपंचायतीने एप्रिल ते जून या महिन्यात ३० लाखांचे बिल भरूनही पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे शहरातून वाढलेली ओरड पाहता पालिकेने विहिरींवरून शक्य तेवढा पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, त्यातही एका विहिरीवरील मोटार जळाल्याने दुष्काळात तेरावा महिना, असे म्हणायची वेळ आली आहे. मात्र, लवकरच ही समस्या सुटेल. नादुरुस्त पंपाची दुरुस्ती एक नवीन पंप खरेदी करण्यात येणार आहे.