शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची पाण्यासाठी ‘वणवण’

सामना प्रतिनिधी । मालवण

अकराशेहुन अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन, मालवण येथे भीषण पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसाला ८० हजार लिटर पाण्याची आवश्यकता असताना आठवड्यातून केवळ एकदाच ५० ते ६० हजार लिटर पाणी उपलब्ध होत असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दरम्यान, येत्या चार दिवसात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास २ जानेवारी रोजी मालवण नगरपरिषदेवरच धडक देत हंडा-कळशी आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांना दिला आहे.

जिल्ह्यातील एकमेव अशा मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे अकराशेहुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर येथील वसतिगृहात १५० विद्यार्थी व १०० विद्यार्थिनी राहतात. तसेच शिक्षक व १५० हुन अधिक संख्येने असलेले कर्मचारी येथील शासकीय निवासस्थानात रहातात. मालवण पालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेवरून तंत्रनिकेतनला पाणीपुरवठा केला जातो. तंत्रनिकेतनच्या मुख्य पाईपलाईनवर खासगी नळकनेक्शन देण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी पाईपलाईनलाही गळती लागली. त्यामुळे तंत्रनिकेतनला अपुरा पाणीपुरवठा गेल्या अनेक माहिन्यांपासून होत आहे. गेले काही दिवस तर आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

तंत्रनिकेतन येथे असलेल्या ५ बोअरवेल पैकी ३ बोअरवेल बंद आहेत. तर २ बोअरवेल मधून अवघ्या एक ते दोन तासासाठीच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सिंधुदुर्गसह राज्याच्या कानापोऱ्यातून येथे शिक्षणासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येत्या चार ते सहा जानेवारी या कालावधीत तंत्रनिकेतन येथे विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यावेळी हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या सर्वांचा विचार करता येथील विद्यार्थी व शिक्षक वर्गाची होणारी वणवण दूर करून होणाऱ्या क्रीडा महोत्सवापूर्वी पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा दोन जानेवारी रोजी मालवण पालिकेवर धडक आंदोलनाचा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी दिला आहे.

पाणी विकत घेवुन पिण्याची वेळ
पालिकेच्या नळपाणी योजनेतून येणारे पाणी अनेक वेळा गढूळ असते. गेले काही दिवस तर आठवड्यातून एकदा येते. पाण्याशी निगडित असलेल्या दैनंदिन गरजाही भागवताना येथील विध्यार्थी व शिक्षकांना समस्या निर्माण होत आहेत. येथील सर्वच विध्यार्थी व शिक्षकांना पाणी विकत घेवुन पिण्याची वेळ आली आहे.

अभ्यास टाकून विध्यार्थी पाण्याच्या रांगेत
तंत्रनिकेतन येथून शिक्षण घेवुन बाहेर पडणारे विध्यार्थी इंजिनियर होऊन देशाचे भविष्य घडवणार आहेत. असे असताना त्यांना अभ्यास सोडून पाण्याच्या रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.