रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, १७६ वाड्या तहानलेल्या

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. जिल्ह्यामधील ९५ गावांतील तब्बल १७६ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्याचबरोबर काही गावांतून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी सुरू झाली आहे.

९५ गावांतील १७६ वाड्यांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ५ गावांतील ६ वाड्यांमध्ये एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दापोलीमध्ये १० गावांतील १७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू असून एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खेडमध्ये सर्वाधिक ३२ गावांतील ५६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी ७ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. गुहागरमधील ४ गावांतील १२ वाड्यांमध्ये, चिपळूणमध्ये १७ गावांतील ३३ वाड्यांमध्ये ३ टँकरनी, संगमेश्वर तालुक्यात १९ गावांतील ३७ वाड्यांमध्ये २ टँकरनी, लांजा तालुक्यात ७ गावांतील १४ वाड्यांमध्ये एका टँकरने आणि रत्नागिरी तालुक्यातील एका गावातील एका वाडीमध्ये एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. १५ मेनंतर जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईमध्ये प्रचंड वाढ झाली.