संपूर्ण विदर्भ जलसंकटात

सामना प्रतिनिधी । नागपूर

ऐन हिवाळ्यातच संपूर्ण विदर्भ जलसंकटाच्या उंबरठ्यावर आहे. पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक असून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याशी तुलना केल्यास, सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. कमी पडलेल्या पावसामुळे विदर्भातील धरणे पुरेशी भरली नाही. त्यामुळे आलेल्या नवीन वर्षात विदर्भात भयंकर जलसंकट येण्याची शक्यता आहे.

नागपूरला जलपुरवठा पेंच धरणातून होतो; परंतु मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे यंदा पेंच धरणात पुरेसे पाणी भरले नसल्याने नागपुरात होणाऱ्या पिण्याच्या पाण्या पुरवठ्यावर कपात सुरु झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा, तसेच नागपुरात ३० टक्के पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगत, नागपूर महापालीकेकडून नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या पाण्याचे ऑडीट करण्यात येणार असल्याचे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगीतले.

राज्याच्या तुलनेत सध्या विदर्भातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन हिवाळ्यातच विदर्भातील बऱ्याच भागात पाणीटंचाईचे सावट दिसायला लागले आहे. नागपूर सारख्या शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. आणीबाणीप्रमाणे काटकसर करुण पाणी वापरण्याचा सावधगिरीचा सल्ला सिंचन विभाग देत आहे.