पाणी टंचाईची मंजुर कामे तात्काळ पुर्ण करा – आमदार वैभव नाईक

तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईसंदर्भात बैठकीत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. शेजारी संतोष साटविलकर, राजेंद्र पराडकर, सरोज परब, मनीषा वराडकर, अशोक बागवे आदी. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी । मालवण

तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ दरवर्षी आराखडा केला जातो. यातील मंजूर कामांपैकी काही ठराविकच कामे पूर्ण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जी कामे पूर्ण झाली नाहीत ती कामे प्राधान्याने पूर्ण केल्यास ७० टक्के पाणीटंचाई दूर होईल. यादृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रलंबित कामे मार्गी लावावीत अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठकीत केल्या.

कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्याबरोबरच आराखडा तयार करण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा परिषद सदस्य सरोज परब, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, नायब तहसीलदार साईनाथ गोसावी, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर, अजिंक्य पाताडे, विनोद आळवे, सहायक गटविकास अधिकारी संजय गोसावी यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीटंचाईचा आढावा घेत त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहेत याचा आढावा घेण्यात आला. यात उपसभापती अशोक बागवे यांनी आक्रमक भूमिका घेत गेली दोन वर्षे त्रिंबक बागवेवाडीचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यात आलेला नाही. स्थानिक ग्रामस्थांना आणखी किती वर्षे पाण्यापासून वंचित ठेवणार असा प्रश्‍न केला. गावात बैठक घेऊन हा पाणीप्रश्‍न सोडविण्यात येईल असे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्पष्ट केले.

आंगणेवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळल्याने यात्रा कालावधीत भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे याठिकाणी आवश्यक ती कार्यवाही यात्रोत्सवापूर्वी करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या गायत्री ठाकूर यांनी केली. धामापूर सरपंच यांनी गोड्याचीवाडी येथील पाणीटंचाईची समस्या गेल्या दोन वर्षात सोडविण्यात आलेली नाही. दरवर्षी केवळ आश्‍वासने दिली जातात. त्यामुळे यावर्षी तरी ही कामे प्राधान्याने घेण्यात यावीत असे सांगितले.

तालुक्यात ज्या अपूर्ण पाणी योजना आहेत त्यांची माहिती आताच सर्व ग्रामपंचायतींनी द्यावी. ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न संबंधित विभागाने करावा. कारण पाणीटंचाई निवारणार्थ गतवर्षी ७२ कामे घेण्यात आली. यातील २६ कामांना मंजूरी मिळाली. १६ कामे पूर्ण झाली तर ५ कामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नवीन कामे सुचविण्यापूर्वी जी कामे रखडली आहेत ती पूर्वी पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना आमदार नाईक यांनी यावेळी दिल्या.
दरवर्षी पाणीटंचाईचा आराखडा बनविताना जी कामे सुचविली जातात. ती कामे मार्गी लावताना त्या ठिकाणी गाडी जात नाही. बक्षीसपत्र यासह अन्य समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या समस्या ज्या ठिकाणी नाहीत अशीच कामे सुचविण्यात यावीत. चौदाव्या वित्त आयोगातून नियमात बसतील असेच प्रस्ताव ग्रामपंचायतीने करावेत आणि ते पंचायत समितीकडे पाठवून द्यावेत अशा सूचना गटविकास अधिकारी श्री. पराडकर यांनी दिल्या.