बाफळूनवासीयांची पाण्यासाठी वणवण, ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ

93

सामना ऑनलाईन, सुरगाणा

तालुक्यातील बाफळून गावात तीव्र टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. महिलांसह पुरुषही घोटभर पाण्यासाठी रानोमाळ हिंडत आहेत. सध्या पंचायत समितीत २२ गावांतील पाणीटंचाईचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत सुरगाणा तालुक्यात बाफळुन, झुडीपाडा, म्हैसमाळ, शिरीषपाडा, जामनेमाळ, गळवड, मोरडा, झुडीपाडा, गावीतपाडा, शिवपाडा, साजोळे, वाघाडी, ठाणगाव, दाडीची बारी, सुकापूर, पळशेत, देवळा, मोठी घोडी, मोहपाडा, खडकीपाडा, खडकमाळ, सजयनगर, या २२ गावचे प्रस्ताव पंचायत समितीत आले आहेत अशी माहिती पाणीपुरवठा टंचाई शाखा रफीक शेख, यांनी दिली. या २२ पैकी म्हैसमाळ, शिरीषपाडा, जामने माळ, गळवड, मोरडा या ४ गावांना टँकर मंजूर असुन बाकीच्या गावांना का मंजुरी मिळत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एक हंडाभर पाण्यासाठी रात्री तीन ते चारपासून विहिरीवर रात्र जागून काढावी लागत आहे. जनावरांची स्थिती यापेक्षाही गंभीर बनली आहे, बाफळून हे गाव उंच डोंगरावर असून त्याच्या चहूबाजूंनी पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. बाफळून येथे दोन महिन्यांपासून ही परिस्थिती आहे, येथे अद्यापही टँकर पोहोचलेला नाही. मात्र प्रशासन अजूनही ढिम्मच आहे. सुरगाणा तालुक्यात पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असूनही पाणी अडविण्यासाठी प्रशासनाचे कोणतेही नियोजन नसल्याने उन्हाळ्यात येथील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या दूषित पाण्यामुळे अनेक बालकांना पोटाचे विकार, ताप, खोकला, ढाळवाती असे वेगवेगळे आजार होताना दिसत आहे. या टंचाईग्रस्त गावामध्ये ठिकठिकाणी छोटे मोठे पाझर तलाव होण्याची गरज आहे. प्रशासनाने तत्काळ पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी अन्यथा सुरगाणा पंचायत समितीवर हंडामोर्चा काढण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला.
या गावात अजूनही ठिकठिकाणी जुन्या लाकडी विहिरी बांधलेली असून त्या पूर्णपणे कोरड्याठाक पडल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाने तत्काळ पाहणी करून कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या