नगरमधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती, मुकुंदनगरमध्ये आठ दिवसांपासून पाणी नाही

नगर शहरातील मुकुंदनगर येथील गोविंदपुरा भागातील बडी मरियम मशिदीच्या मागील परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यामुळे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. रोजाच्या सहेरीसाठी पहाटे चार वाजता उठावे लागते. यानंतर महिलांना दिवसभर रोजामध्ये घरातील कामे करावी लागतात. मात्र, या भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. या परिसरातील नागरिकांना भरउन्हात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ठेकेदारामुळे पाणीबाणीची वेळ

या परिसरात महापालिकेने सिमेंटचा रस्ता केला आहे. हा रस्ता करताना ठेकेदाराने भूमिगत गटारीचे चेंबर बंद करून टाकले आहे. तसेच रस्त्याचे हे काम करताना बडी मरियम मशीदच्या मागील गल्लीमधील नागरिकांचे नळजोड तोडून टाकले आहेत. यामुळे येथील घरांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी आलेले नाही. नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याने येऊन पाहणी केली आणि आजच तुम्हाला पाणी येईल, असे आश्वासन दिले. परंतु अद्यापि नागरिकांना पाणी मिळाले नाही.

मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

या भागातील रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने बडी मरियम मशीदच्या मागील गल्लीमधील ड्रेनेजच बंद केले. यामुळे या गल्लीमधील रस्त्यांवर ड्रेनेजचे मैलामित्रित पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.