पुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यात सध्या अघोषित पाणी आणीबाणी लागू झाल्याने सध्या वातावरण तापले आहे. याच संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विचारणा करण्यात आली असता त्यांनी पुणे शहराला सध्या 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला असल्याची माहिती दिली. खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाजन बालेवाडी येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पुण्याला सध्या 1350 टीएमसी पाणी जलसंपदा विभागाकडून दिले जात आहे. हे पाणी असेच सुरू ठेवण्याचे आदेश सध्या तरी दिलेले आहेत. धरणामध्ये पाण्याचा साठा किती शिल्लक आहे याबाबत माहिती घेतलेली आहे. तसेच, उन्हाळ्यात शेतीसाठी तसेच पिण्यासाठी पाणी शिल्लक कसे राहील याबाबत विचार सुरू आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी, महापालिकेचे काही अधिकारी यांची संयुक्त बैठक मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही महाजन यावेळी म्हणाले.