नासाचा ऐतिहासिक शोध! चंद्रावर उल्का वर्षावातून होतेय पाण्याची निर्मिती

42

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावरील पाण्याच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. चंद्रावर उल्का वर्षावादरम्यान पाण्याची निर्मिती होत असल्याचं नासाने शोधून काढलं आहे.

नासाने चंद्रावर पाठवलेल्या लूनार एटमसफिअर अँड डस्ट एनव्हायरमेंट एक्सप्लोअरर या रोबो मशीनने हा शोध लावला आहे. या ऐतिहासिक संशोधनासाठी या रोबो मशिनने उपग्रहाच्या साहाय्याने ऑक्टोबर 2013 ते एप्रिल 2014 पर्यंत चंद्राचं परिभ्रमण केलं होतं. चंद्रावर जीवसृष्टी शोधण्याचे प्रयत्न सुरू असताना उल्का वर्षावादरम्यान चंद्रावर पाण्याच्या बाष्पाची निर्मिती होत असल्याचं दिसून आलं आहे. चंद्रावर उल्का पडताना बाष्प तयार होत असेल तर पाण्याचा अंश निर्माण होण्याची शक्यता वाढली असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

प्रत्यक्ष चंद्रावर पाण्याचा अंश आहे किंवा नाही हे समजण्यासाठी आता यामुळे मदत होणार आहे. चंद्रावरील क्रेटर (खड्डे), चंद्राचा इतिहास, त्याच्यावरील भौगोलिक बदल आणि क्रेटरमध्ये आढळू शकणारा बर्फ यांच्याबाबतीतही पुढील अनुमान लावण्यास या संशोधनाची मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या