येळगाव धरणातील मृतसाठ्यावर भागवली जात आहे बुलढाणेकरांची तहान

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

यावर्षी पावसाने उघडीक दिल्यामुळे बुलढाणा शहराला येळगाव धरणाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरु असून येळगाव धरणात केवळ दीड महिना पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. पावसाने अशीच उघडीक दिल्यास बुलढाणेकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलढाणा शहराला येळगाव धरणातून पाणीपुरवठा होता. या धरणात सध्या २.३० दलघमी इतका मृतसाठा आहे. हा साठा केवळ २० टक्के असून दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात धरण ५० ते ६० टक्के भरत असते. परंतु यावर्षी पावसाने दिलेल्या उघडीकमुळे धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती दीड महिने राहिल्यास पेनटाकळी धरणावरुन जी अतिरिक्त पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे ती कार्यान्वीत करावी लागेल तसेच खडकपूर्णा योजनेचे जे काम ८० टक्के झाले आहे त्याला गती देऊन ही योजना सुद्धा सुरु करावी लागेल तेव्हाच कुठे बुलढाणा शहराचा पाणी प्रश्न सुटू शकतो असे मत बुलढाणा पालिकेचे कनिष्ठ पाणीपुरवठा अभियंता राहुल मापारी यांनी ‘‘सामना’’शी बोलताना दिली.