कोपरगावकरांची प्रतिक्षा संपली : 1 मे रोजी गोदावरी कालव्यातून पाणी – स्नेहलता कोल्हे

4

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. कोपरगाव शहराची पाणीटंचाई लक्षात घेता पंधरा दिवस अगोदर पाणी सोडण्याची मागणी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यानुसार बुधवारी (दि. 1 मे ) रोजी पाणी सोडण्यात येणार, अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली असून त्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कमी पाऊस, दुष्काळाची तीव्रता, शहराची लाखाची संख्या, उन्हाळ्याची तीव्रता, त्यामुळे शहरात पाणीबाणी निर्माण झाली होती. तसेच गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यावरील ग्रामिण भागातील पिण्यांच्या पाणी योजनांचे साठवण तलावही कोरडे पडले आहेत. तेथेही पिण्यांच्या पाण्यांची टंचाई आहे. याबाबत उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदिंशी वेळोवेळी संपर्क करून कोपरगांव शहरवासियांचे सध्या पिण्यांचे पाण्यांचे हाल होत आहेत. तेंव्हा पाटबंधारे खात्याच्या ठरलेल्या नियोजनाआधी शहरवासियांना प्यायला लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी पंधरा दिवस आधीच त्याचे नियोजन करावे म्हणून मागणी केली होती. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडेही याचा पाठपुरावा केला. त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत संबंधीत विभागास गोदावरी कालव्यांना पंधरा दिवस आधीच पिण्यांचे पाण्यांचे आर्वतन सोडण्यांबाबत आदेश केले आहे. त्यामुळे शहरवासियांची पाणी तीव्रता काही प्रमाणांत कमी होईल असेही सौ. कोल्हे शेवटी म्हणाल्या.