पाण्यावर तरंगणारा दगड, शिवमुद्रा संग्रहालयात पर्यटकांची गर्दी

सामना प्रतिनिधी, मालवण

मालवण समुद्रकिनारी पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सापडला असून तो पाहण्यासाठी नागरिकांबरोबर पर्यटकांची गर्दी लोटली आह़े संग्रहकार आणि शिवमुद्रा संग्रहालय मालवणचे संचालक उदय रोगे यांना तो सापडला त्यांनी तो आपल्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवला आहे. सुमारे दोन किलो वजनाचा व एक फूट लांबीचा हा दगड आहे.

मालवण मेढा भागात राहणाऱ्या उदय रोगे यांना अलीकडच्या काळात मालवण समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना वाळूत रुतलेला काळा, गोल, गुळगुळीत दगड आढळून आला. रोगे हे विविध वस्तूंचे संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या दगडांचाही संग्रह करण्यास सुरुवात केली आहे. आपणास वाळूत सापडलेला हा दगड आपल्या संग्रहात राहील म्हणून तो ताब्यात घेतला. दगडाला शेवाळ व माती लागल्याने तो दगड धुण्यासाठी म्हणून पाण्याच्या हौदात त्यांनी टाकला. मात्र दगड पाण्यावर तरंगत राहिला. रोगे यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या या दगडाची माहिती गुगल व अन्य ठिकाणी शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना श्रीलंकेत रामसेतू बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला तो दगड याच प्रकारातला असल्याची माहिती मिळाली.

अशा प्रकारचे दगड दक्षिण हिंदुस्थानाबरोबरच श्रीलंका आणि जपान या भागातही आढळून येतात. ज्वालामुखीच्या लाव्हेचा पाण्याशी संयोग होऊन अशा प्रकारचे दगड निर्माण होतात अशी माहितीही रोगे यांना मिळाली आहे. त्यांच्या शिवमुद्रा संग्रहालयात विविध प्रकारच्या ४०४० शिवमुद्रा, १ लाख विविध प्रकारची बटणे, १ लाख विविध प्रकारचे स्टिकर, २२ हजार विविध प्रकारची बाटल्यांची झाकणे, ६२५ विविध प्रकारचे माचीस बॉक्स, १५ देशांची पोस्टाची तिकिटे, ४५ देशांची नाणी, पोर्तुगीज नाणी, शिवराई, विविध विषयांवर वर्तमान पत्रांची कात्रणे, जुन्या तांब्या पितळीच्या व विविध धातूच्या वस्तूंचा समावेश आहे. या त्यांच्या संग्रहालयाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.