आम्हीही मुंबईकर

प्रदीप पातडे,समुद्र जीव अभ्यासक

नुकताच मुंबईत डॉल्फिन दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला… मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन आहेत…

डॉल्फिन मुंबईत दिसणं सामान्य गोष्ट आहे. हिवाळय़ात बऱयापैकी डॉल्फिन नजरेस पडतात. या काळात समुद्रात तारली आणि बिल्जा माशांच्या जाळ्याच्या बाजूला बरेच डॉल्फिन दिसतात. त्यामुळे या काळात मुंबईत ते दिसणं काही चमत्कार नाही. मांडवासाठी फेरी घेतली तर तिथे डॉल्फिन पाहायला मिळतात, एवढेच नाही तर मरीन ड्राईव्हलाही त्यांची झलक पाहायला मिळते. डॉल्फिन जवळपास सात-आठ वर्षे मी बघत आहे. त्यांचा समूह असतो. कधी पन्नास तर कधीतरी दहा-बारा पण दृष्टीस पडतात.

कोकणात डॉल्फिन आहेत. सिंधुदुर्गात गेल्यावर डॉल्फिनची सफारी पाहायला मिळते. कोळी बांधवांना मासेमारी करताना ते दिसतात. हल्लीच मुंबईत डॉल्फिन दिसल्याचा एक व्हिडीओ वायरल झाला होता. तो व्हिडीयो चुकीचा नाहीय. मुंबईत ते आहेत. हिंदुस्थानात आढळणाऱया डॉल्फिनना ‘इंडियन ओशियन हम्पबॅक डॉल्फिन’ असे नाव दिलेले आहे. मासेमारी आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात केली जाते. डॉल्फिन इंडियन मेड असल्यामुळे मासेमार त्यांना कधीच पकडत नाहीत आणि त्यांची कधी विक्री पण होत नाही. कोकणात डॉल्फिन शो होतात. ज्या ठिकाणी डॉल्फिन दिसतात त्या ठिकाणी मासेमार पर्यटकांना घेऊन जातात आणि ते दाखवतात. तारली आणि बिल्जा माशांच्या मागे डॉल्फिन असतात. त्यामुळे या दिवसात ते दिसतच असतात. मुळात मासेमार लोकांना माहिती आहे की कोणती जागा डॉल्फिनसाठी योग्य आहे आणि त्याच ठिकाणी ते घेऊन जातात. त्यामुळे डॉल्फिन सफारी आपल्याकडे होते.

dolphin-in-mumbai

डॉल्फिन सफारी कठीण, मात्र अशक्य नाही

मुंबईत डॉल्फिन शो करणं फार कठीण आहे. कारण बऱयाचशा ठिकाणी ते संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. त्याच्यामुळे तिकडे अशा प्रकारचे शो होणं थोडसं कठीण वाटतं. नेमकं कुठून जायचं हाही प्रश्न उभा राहतो. मुंबईत जेटी नाहीत, त्यामुळे असे शो करणं शक्य नाही आहे. पण नक्कीच त्यासाठी थोडीशी मेहनत घेतली तर जंगल विभाग, मांडवी सेल, यांनी मनावर घेतले तर हे शक्य आहे. साधारणपणे मांडवाला जाताना डॉल्फिन दिसतात. डॉल्फिन शो म्हणता येणार नाही पण सफारी करणं शक्य आहे. २०१३ साली मी तेरा-चौदा डॉल्फिन जवळजवळ चोवीस दिवस पाहत होतो. त्यामुळे डॉल्फिन सफारी आपल्या इथे शक्य आहे. फक्त प्रश्न असा आहे बोटीने जायचे कसे? हा एक मुद्दा आहे. त्याच्यावर योग्य नियोजन आणि अभ्यास केला तर मुंबईत डॉल्फिन सफारी होऊ शकते. डॉल्फिन सफारी आपल्याकडे वर्षभर होऊ शकत नाही. काही ठरावीक काळात होऊ शकते. म्हणजे आता डॉल्फिनचा मोसम सुरू झाला आहे. या मोसममध्ये आपण करू शकतो. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्चपर्यंत आपण डॉल्फिन दाखवू शकतो.

मरिन लाइफ श्रीमंत, पण दुर्लक्षित

‘मरिन वॉक’ शो घेतो त्यात आम्ही बरेच मरिन ऍनिमल, सी ऍनिमल, स्टार फिश, स्पाँज,प्रवाळ वगैरे दाखवतो. मुंबईत मरिन लाइफ तर आहेच. पण दुर्लक्षित असल्याने या शोच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रमोट करतोय. मुंबईत भरपूर जलचर असून आपली मरिन लाइन खूप श्रीमंत आहे. मरिन ड्राईव्हला गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे काही मासे दिसतात. हाजीअलीला पण दिसतात. नुकतेच जुहूला स्टार फिश पण पाहण्यात आला आहे. आपल्याकडे वेगवेगळे जलचर असूनही ते दुर्लक्षित आहेत. त्याचे कारण आहे आपली शंभर वर्षापूर्वीची कचऱयाचा निचरा करण्याची पद्धत आणि त्यात काहीच बदल झालेले नाहीत. ते सगळं समुद्रात जातय. त्यामुळे मरिन लाइफवर खूप परिणाम होतोय.

प्लास्टिकचा अतिवापर नको...

आपल्याकडे असलेल्या जलचरांचे संवर्धन व्हायला हवे. शंभर वर्षांची जी ड्रेनेज सिस्टम आहे त्याचे योग्यप्रकारे नियोजन केले पाहिजे. त्यावेळी दोन लाख लोकसंख्या होती आता दोन कोटी आहे. त्याच्यावर ट्रिटमेण्ट प्लांट बनवायला हवेत. प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. त्याच्या वापरावर नियंत्रण आणले पाहिजे. घराघरांत मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक वापरले जाते. शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होतेय.तसेच वेगवेगळ्या वस्तू , पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, सांडपाणी हेही समुद्राला दूषित करत असतात.  बरेचसे अनप्लांड प्रोजेक्ट येतायत. कोस्टल रोड, मेट्रो या सगळय़ा प्रकल्पाआधी शासनाने लक्ष द्यायला हवे की पाण्यावर उपचार करून पाणी समुद्रात गेले पाहिजे. जेवढे प्रकल्प येत आहेत ते कोस्टल परिसरातच येत आहेत.