आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही, जुही-सचिनमध्ये दुरावा

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. जुहीने बिग बॉस जिंकल्यानंतर या दोघांमध्ये दूरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. पण जुहीने मात्र ते दोघे कधीच एकमेकांसाठी योग्य नव्हते असे सांगितले आहे. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने घटस्फोटाच्या कारणांचा खुलासा केला आहे.

सचिन आणि जुहीचा २००९ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षाची समायरा ही मुलगी देखील आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असून जुही गेल्या वर्षभरापासून सचिनपासून वेगळी राहत आहेत. या दोघांनी २० डिसेंबर रोजी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

“मी आणि सचिन फार वेगळे आहोत. आम्ही कधीच एकमेकांसोबत खूष राहू शकलो नाही. लग्नाच्या सुरवातीच्या दिवसांपासून आमच्यात काही ना काही प्रॉब्लेम व्हायला लागले होते. तरीही आम्ही दोघांनीही एकमेकांना संधी देत आठ वर्ष एकत्र काढली पण गेल्या वर्षी आम्ही ठरवलं की आम्ही एकमेकांसोबत नाहीच राहू शकत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहोत. आम्ही दोघांनीही एकत्र चर्चा करून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आमची मुलगी समायरा ही माझ्याकडे राहणार आहे. मी सचिन कडून कुठल्याही प्रकारची पोटगी घेणार नाही पण मुलीच्या भविष्यासाठी येणारा खर्च आम्ही दोघं मिळून करणार आहोत, असे जुहीने सांगितले.

सचिन व जुहीचा घटस्फोट हा जुहीच्या रागीट स्वभावामुळे होत असल्याच्या बातम्या मध्यंतरी पसरल्या होत्या पण जुहीने या बातम्यांचे खंडन केले आहे. “मी अतिरागीट नाही पण मी स्पष्ट बोलते. मनात काही ठेवत नाही त्यामुळे लोकांना मी रागीट वाटत असेन. मी जे काही आहे ते न घाबरता समोरच्याला सांगते. मला माझ्या या स्वभावाचा अभिमान आहे. कुठलंही लग्न हे एका व्यक्तीच्या चुकीमुळे तुटत नाही किंवा एका व्यक्तीमुळे ते यशस्वीही होत नाही. त्यामुळे या घटस्फोटासाठी देखील मी एकटी जबाबदार नाही” असे सांगत जुहीने तिच्याबाबत अफवा पसविणाऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे.