पाकड्यांबरोबर सामन्यांसाठी हिंदुस्थानला जबरदस्ती करू शकत नाही- आयसीसी

सामना ऑनलाईन, कराची

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकड्यांसोबत आम्ही हिंदुस्थानला क्रिकेट सामने खेळण्याची जबरदस्ती करू शकत नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. दहशतवादाचा अड्डा असलेल्या पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळण्यास हिंदुस्थानने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. २०१४ साली दोन्ही देशात एक करार झाला होता ज्या अंतर्गत २०१५ ते २०२३ दरम्यान ६  द्विपक्षीय मालिका खेळणं अपेक्षित होतं, मात्र पाकिस्तानने सातत्याने दहशतवादाला खतपाणी घातल्याने आणि हिंदुस्थानात घडवून आणलेल्या दहशतवादी कृत्यांमुळे भडकलेल्या हिंदुस्थानाने या मालिकांना स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्ह रिचर्डसन लाहोरमध्ये आले असताना दोन्ही देशांमधील क्रिकेट सामन्यांबाबत त्यांना विचारण्यात आलं. तिथल्या पत्रकारांनी प्रश्नांदरम्यान हिंदुस्थानला आयसीसी झुकतं माप देत असल्याचा आरोपही केला. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत रिचर्डसन म्हणाले की आम्ही हिंदुस्थानवर क्रिकेट सामने खेळण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. मालिकांचं आयोजन हे दोन देशांमधील सामंजस्यावर आधारीत असतं. आम्हालाही या दोन देशांमध्ये सामने व्हावेत असं वाटतं मात्र एकूण परिस्थिती बघितल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानसोबत सामने न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचं रिचर्डसन यांचं म्हणणं आहे.