मुस्लीम समजून वेटरला टीप देण्यास नकार

सामना ऑनलाईन । टेक्सास

९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत मुस्लिम समाजाबदद्ल वाढलेला रोष आजही कायम असल्याचे अधोरेखित करणारी घटना टेक्सासमध्ये घडली आहे. एका रेस्टोरंटमधील वेटरला त्याचे नाव मुस्लीम असल्याने ग्राहकाने टीप देण्यास नकार दिला. एवढयावरच तो ग्राहक थांबला नाही तर त्याने बिलावर ‘आम्ही दहशतवाद्यांना टीप देत नाही’ असेही लिहून दिले. यामुळे मानसिक धक्का बसलेल्या वेटरने ते बिल फेसबुक वर पोस्ट केले. खलिल कॅविल ओडीशन असे या वेटरचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याचे नाव जरी खलिल असले तरी तो मुस्लीम नाही तर ख्रिच्छन आहे. तो टेक्सासमधील “स्टॉकग्रास स्टील हाऊस रेस्टोरंट “मध्ये काम करतो.

१५ जुलैला रात्री एक ग्राहक रेस्टॉरंटमध्ये आला. त्याने जेवण केले. त्यानंतर वेटरला बिल आणण्यास सांगितले. वेटरने त्याला १०८ डॉलरचे बील आणून दिले. ग्राहकाने त्याला १०८ डॉलर दिले. पण त्याआधी त्याने बिलावर एक नोट लिहली. ती वाचून खलिलला धक्का बसला. कारण त्यावर ‘आम्ही दहशतवाद्यांना टीप देत नाही’ असे ग्राहकाने लिहले होते. त्यानंतर ग्राहक तिथून निघून गेला. पण खलिलला मात्र या मजकुराने अस्वस्थ केले. त्याने हे बील फेसबुकवर पोस्ट केले. ‘या मजकुराने मला अस्वस्थ केले असून काय करावे ते कळत नाहीये. माझ्या पोटात दुखत असून विचार करण्याची व समजण्याची क्षमताच संपली आहे. आधी मी गप्प होते. पण मी आता ही बाब फेसबुकवर शेअर करत आहे. मी लोकांना एवढेच सांगू इच्छित आहे कि अजूनही हा कट्टर वाद संपलेला नाहीये.”

दरम्यान, खलिलच्या या पोस्टवर अनेकांनी त्याचे समर्थन केले असून कट्टरतावादाचा निषेध केला आहे. तसेच खलिलच्या एका मित्राने त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्याने खलिल मुस्लीम नाही तो ख्रिश्चन आहे. पण त्याचे नाव मुस्लीम असल्यानेच त्याच्याबरोबर ही घटना घडल्याचे म्हटले आहे.