मुजोर अधिकार्‍यांना आम्ही ठोकणारच – आमदार बच्चू कडू

464

सामना प्रतिनिधी । नगर

आजही काही अधिकारी मुजोरीने वागतात. हरामखोर हेच कायदे मोडतात. सामान्यांच्या प्रश्‍नासाठी आम्ही हात उगारल्यावर गुन्हा दाखल होतो. पण ते जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत त्यांना हाणणारच, असा सज्जड इशारा आमदार बच्चू कडू यांनी देऊन मुख्यमंत्र्यांनी सेवा हमी कायद्या अंतर्गत किती कारवाई केली हे जाहीर करावे. शेतकर्‍यांच्या विषयी महावितरणाने जे धोरण घेतले ते चुकीचे असून त्यामध्ये बदल केला नाही तर मंत्री बावणकुळे यांचा प्रतिकात्मक पुतळा विधान भवनाबाहेर उलटा टांगण्याचा इशाराही त्यांनी दिला.

शनिवारी नगर येथे प्रहार संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी विनोद परदेशी, अजय महाराज महाराज बारस्कर, संतोष पवार, अमित धस आदी उपस्थित होते.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, आज अधिकारी मुजोरीने वागत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवत नाहीत. तेच कायदा मोडतात. 25 वर्षांमध्ये साधा अपंगाचा कायदा करता आला नाही. मग या शासनाच्या अधिकार्‍यांची पूजा करायची का? अधिकारी चांगले वागणार नसतील तर आम्ही त्यांना मारल्या शिवाय राहणार नाही. ही वेळ का येते, याचेही त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असे सांगून आम्ही हात उगारल्यावर आमच्यावर 353 चा गुन्हा दाखल होतो. हेच हरामखोर अधिकारी कायदा मोडतात, फाईल दाबबात मग हे कोणत्या अधिकारात बसते असा सवाल करत, मुख्यमंत्र्यांनी सेवा हमी कायद्या अंतर्गत काय कारवाई केली, हे उघड करावे असेही ते म्हणाले.

राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना महावितरणाने पाणी उपसण्याकरीता डीपी जळाल्यावर वेगवेगळे दर लावण्याचा निर्णय घेतला. तो जर मागे घतला नाही तर मंत्री बावनकुळे यांचा प्रतिकात्मक पुतळा विधान भवनाबाहेर टांगला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकर्‍यांचेच पाण्याचे ऑडीट कसे काय होते, फाईव्ह स्टार हॉटेलचे ऑडीट कधी झाले नाही. तुम्ही जर विरोध करणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आज घरकुलाचा पाच टक्के निधी खर्च होत नाही त्याला जबाबदार कोण? असा सवाल करीत अपंगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी मागणीही कडु यांनी यावेळी केली.

स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये ज्या नुकत्याच परीक्षा झाल्या, तेथे सामुहीक कॉपीचा प्रकार घडला गेला, एकाच वेळेला पेपर बाहेर गेले, सरकार काय झोपा काढत होते काय? का तेथे ‘टाळीवाले’ बसवले होते का? असा सवाल करुन जेवढे 50 वर्षात टेंडर आयटीचे झाले नाही तेवढे यांच्या कार्यकाळात निघाले आहेत. आता सामुहीक कॉपी होते. यासारखी महाराष्ट्रात शोकांतिका नाही. अशांना ठोकले पाहिजे की नाही? जर प्रश्‍न तुम्ही सोडवले नाही तर आम्हाला भगतसिंग व्हावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

येथील मनपात जो घोटाळा झाला आहे. या संदर्भातला आवाज आम्ही विधानसभेत उठवणार आहोत. येथे एका सभेच्या चहाचे बिल 30 हजार रुपयांपर्यत जाते, लाखो रुपयांची बीले काढली जातात. कोणीच काही बोलत नाही. म्हणजेच मोंदीच्या राज्यात चहाही महागला आहे. नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगून आम्ही जनतेबरोबर युती करणार आहोत अन्य कुणा बरोबर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या