कितीही दबाव आणा, झुकणार नाही; 2024 मध्ये दिल्लीत बसणारच! पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विश्वास

मराठी भाषा कशी जगणार, कशी पुढे जाणार ही चिंता दूर ठेवून मराठी भाषा दिन साजरा करूया. मराठी भाषा कधीच थांबणार नाही आणि कुणासमोर झुकणारही नाही. अगदी छत्रपती शिवरायांच्या काळातही दिल्लीला झुकवणारी आपली मराठी भाषा आहे. त्यामुळे कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आजदेखील ती दिल्लीसमोर झुकणार नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याचा प्रयत्न केला तरी घाबरण्याचे कारण नाही. 2024 मध्ये आपण दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच, असा जबरदस्त विश्वास शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मराठी भाषा गौरव दिन सोहळय़ात व्यक्त केला.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृह येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शानदार सोहळय़ाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महासंघाचे माजी अध्यक्ष सुधीर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, महासंघाचे कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव महासंघ सरचिटणीस खासदार अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, विनोद घोसाळकर, आमदार विलास पोतनीस, सुनील शिंदे, चंदूमामा वैद्य, इंडियन ऑइलचे कार्यकारी व्यवस्थापक उमाकांत प्रसाद सिंग, महाव्यवस्थापक विजय गवारे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री प्रदीप मयेकर, वामन भोसले, उल्हास बिले, प्रदीप बोरकर, सुनीता अधिकारी, शरद एक्के, विश्वासराव, विजय अडसुळे, अमोल मटकर, विलास जाधव, शरद जाधव, उमेश नाईक, बाळा कांबळे यांनी परिश्रम घेतले.

भगवा फडकतोय तोपर्यंत मुंबईचे स्थान कोणीही हिरावू शकत नाही! गजानन कीर्तिकर

आज आस्थापने महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचे कारस्थान केले जात आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे, मात्र जोपर्यंत मुंबईत भगवा फडकतोय तोपर्यंत मुंबईचे स्थान कोणीही हिरावू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना मुंबई महापालिका निवडणुकीत भगवा फडकवण्याचा निर्धार करूया, असे आवाहन शिवसेना नेते, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिवसैनिकांना केले.

असा रंगला सोहळा

मराठी भाषेच्या या सोहळय़ादरम्यान श्रीरंग गोडबोले लिखित-दिग्दर्शित ‘शांतता! मराठीचं कोर्ट चालू आहे’ हा लघुपट सादर करण्यात आला. अजितेम जोशी लिखित आणि दिग्दर्शित ‘माझ्या मराठीचा‘च’ बोलू’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे संगीत संयोजन  पंडित आप्पा वढावकर यांनी केले. सुप्रसिद्ध कवी डॉ. महेश केळुसकर व शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे यांनीही आपली कला सादर केली. सुप्रसिद्ध रिद्मॅटिक जिम्नॅस्टिक प्रशिक्षक वर्षा उपाध्ये यांच्या कलापथकातील 12 सुकन्यांचा समूहासह रिद्मॅटिक जिम्नॅस्टिक सादर केले तर ‘सारेगमप लिटिल चॅम्प स्टार’ स्वरा जोशी हिनेही आपल्या गाणी सादर करून सर्वांची मने जिंकली.

शाळा मग कोणत्याही बोर्डाची असो, त्यात 10 वीपर्यंत मराठी शिकवले जाणारच

पालकांनाच इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी शाळांत मुलांना पाठविण्याची इच्छा असते. यामुळे मराठी भाषेच्या शाळा कमी होताहेत हे सत्य आहे. मुंबई महापालिकेच्या 1232 शाळा आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली याचे वृत्त वर्तमानपत्रात यायचे. मुंबई महापालिकेच्या शाळेत एसएससी बोर्डाबरोबरच सीबीएसई, आयसीएसईच्या 11 शाळा सुरू केल्या. चार हजार जागांसाठी 10 हजार अर्ज आले. महापालिका शाळांमध्ये शिकता येईल का, प्रवेशासाठी पत्र मिळेल का, अशी विचारणा होऊ लागली. हे आपले यश आहे. शिक्षण हक्काप्रमाणेच दर्जेदार शिक्षणाचा हक्कही असायला हवा. शाळा मग त्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा, आयसीएसई शाळा, सीबीएसई बोर्डाच्या असतील महाराष्ट्रातल्या शाळेत दहावीपर्यंत मराठी शिकवली जाईल, असा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे मराठी कुठेही मागे पडणार नाही, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

शासकीय मराठी भाषा सोपी व्हायला हवी

आम्ही सभागृहात असतो तेव्हा शिवसेना नेते दिवाकर रावते यांचा आग्रह असतो की, स्पष्ट मराठी बोलणे गरजेचे आहे. मागच्या अधिवेशनात कुणीतरी कॅबिनेट असा उल्लेख केला. त्याला दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळ बोला असे स्पष्ट सांगितले. मी शिवसेना नेते सुभाष देसाई यांना सांगेन की, आपली मराठी कोणालाही सहज समजते, पण शासकीय मराठी भाषा ही समजायला थोडा वेळ लागतो. ही भाषा थोडी सोपी व्हायला हवी यासाठी मराठी भाषा मंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई हे नक्कीच प्रयत्न करतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान काय, हे समोर आणण्यासाठी ग्रंथसंपदा तयार करणार

देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे, मुंबईचे योगदान काय आहे हे समोर आणलेच पाहिजे. महाराष्ट्राचे योगदान देशासाठी काय, जगासाठी काय आहे यावर आम्ही ग्रंथसंपदा तयार करीत आहोत. यातून महाराष्ट्र देशाला कशी दिशा दाखवतोय हे जगासमोर येईल, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.