वेब न्यूज – २०१७ चा गुडबाय

  • स्पायडरमॅन

२०१७ साल हे जाता जाता आपल्याबरोबर काही लोकप्रिय टेक्नॉलॉजी आणि गॅझेट्सनादेखील सोबत घेऊन जाणार आहे. नव्या सालाबरोबरच एक तर या गॅझेट्सचे उत्पादन आणि विक्री थांबलेली असेल आणि टेक्नॉलॉजीजने इंटरनेटला अलविदा म्हटले असेल. या अलविदा म्हणणाऱ्या गोष्टींमध्ये आयपॅड नॅनो, व्हर्च्यूचे लग्झरीयस फोन, AOL मेसेंजर, विंडोज फोन अशा अनेक मातब्बर गोष्टींचा समावेश आहे.

२००५ साली आलेला आयपॉड शफल आणि पुढची पिढी असलेला आयपॅड नॅनो हे दोन्ही अॅपल कंपनी बंद करत आहे. त्यांना अॅपलच्या स्टोअरवरूनदेखील हटवण्यात आले आहे. विंडोजने या वर्षीच्या जुलैमध्येच विंडोज फोनचा सपोर्ट बंद करत असल्याची घोषणा केली होती. आता यापुढे विंडोज आपल्या फोनसाठी कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर अथवा हार्डवेअर बनवणार नाही. २० वर्षांपूर्वी अत्यंत लोकप्रिय आणि मेसेजिंगमधले मोठे प्रस्थ असलेला AOL मेसेंजर बंद करण्याची घोषणा Oath कंपनीने ऑक्टोबरमध्ये केली आहे. आता या मेसेंजरसाठी कोणतेही अपडेट उपलब्ध नसतील. या मेसेंजरसोबतच एकेकाळची लोकप्रिय अशी अल्टो ईमेल सेवादेखील कंपनी बंद करते आहे.

२०१६ मध्ये आलेला पण तितकासा लोकप्रिय होऊ न शकलेला अजून एक मेसेंजर म्हणजे गुगलचा ‘स्पेसेस’. विशेषतः ग्रूप चॅटिंगसाठी बनवलेला हा मेसेंजरदेखील या वर्षीपासून रजा घेतो आहे. व्हर्च्यू कंपनी ही आपल्या रत्नजडित, सोन्याने अथवा इतर किमती धातूने उत्पादन केलेल्या मोबाईल फोन्ससाठी जगप्रसिद्ध आहे. या कंपनीच्या सिग्नेचर रेंजच्या फोनची सुरुवातच ९ लाखांनी होऊन ३२.६ लाख रुपयांपर्यंत होती; पण आर्थिक अडचणीत सापडल्याने ही कंपनीच या वर्षी बंद पडली. गुगल आणि अॅपलच्या म्युझिक सर्व्हिसेसना टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्टने २०१५ साली दाखल केलेली Xbox म्युझिक सर्व्हिसदेखील फारसा तग धरू शकलेली नाही. ३१ डिसेंबर २०१७ पासून ही सेवा पूर्ण बंद होते आहे.