वेब न्यूज – 38 लोकांचा देश

>> स्पायडरमॅन

जगभरात विविध संस्कृतींनी नटलेले 200 पेक्षादेखील जास्त देश आहेत. काही देश तिथल्या रमणीय समुद्रकिनाऱयांसाठी प्रसिद्ध आहेत. काही देश विलोभनीय निसर्गासाठी, तर काही नद्या आणि पर्वतरांगांसाठी. प्रत्येक देशाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. या सर्व देशांमध्ये काहीसा वेगळा देश आहे मोलोसिया. या देशाला ग्रँड रिपब्लिक ऑफ गोल्डस्टीन म्हणूनदेखील ओळखले जाते. 1977 साली स्थापन झालेल्या या देशाला अजूनही युनायटेड नेशन्सची मान्यता मात्र मिळालेली नाही.

मायक्रोनेशन म्हणून ओळख असलेले हे गणराज्य अमेरिकेतील नेवाडा येथे स्थित आहे. अवघ्या अकरा एकरावर पसरलेल्या या देशाची लोकसंख्या अवघी 38 आहे. अधिकृत मान्यता नसली तरी या देशाचे प्रजासत्ताक खूप खास आहे. ‘मालुहिया’ हा मुळात हवाईयन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ होतो शांतता आणि सुसंवाद. या मालुहियावरून आलेला शब्द म्हणजे मोलोसिया. मोलोसिया प्रजासत्ताकाचे स्वतःचे नौदल आहे. या नौदलासाठी अकादमी आहे. स्वतःचे सैन्य आहे. रेल्वे, पोस्टल सेवा, चित्रपटगृह, बँक अशा सेवादेखील उपलब्ध आहेत. स्वतःचे असे आगळेवेगळे रेडिओ स्टेशनदेखील आहे.
मोलोसियाला स्वतःचा राष्ट्रपतीदेखील आहे. विशेष म्हणजे तो स्वतःला हुकूमशहा म्हणवतो. या हुकूमशहाला कांदा खायला आवडत नाही म्हणून त्याने संपूर्ण देशात कांद्याला बंदी घातली आहे. इथे स्थानिक किंवा भेट देणाऱया परदेशी लोकांना कांदा, पालक आणि कॅटफिश खायला अथवा जवळ बाळगायला बंदी आहे. या नियमाचे पालन न केल्यास परदेशी पर्यटकांनादेखील तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या कारणासाठी काही लोकांना तुरुंगातदेखील टाकले आहे. मात्र मुख्यतः या तुरुंगाचा उपयोग प्रतिबंध असलेले पदार्थ देशात घेऊन येणाऱया पर्यटकांना शिक्षा देण्यासाठी होतो. या देशाची लोकसंख्या अवघी 38 असली तरी सध्या इथे फक्त तीन लोक आणि तीन कुत्री वास्तव्यास आहेत. जागतिक पटलावर इतर देशांनी आपली नोंद घ्यावी यासाठी आगामी काळात आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे राष्ट्रपतींचे म्हणणे आहे.