गांधी हत्येवर आधारित वेब सिरिज येणार!

सामना ऑनलाईन । मुंबई

‘फरारी की सवारी’ या हिंदी आणि ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर आता गांधी हत्येवर आधारित वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. दिग्दर्शनच नव्हे तर सहनिर्मितीची धुरा ही राजेश मापुसकर सांभाळणार आहेत. तर या सिरिजची निर्मिती अबंडेंटिया एन्टरटेनमेंट करणार आहे. या वेब सिरिजमध्ये मनोहर मालगावकर लिखित ‘दि मेन हू किल्ड गांधी’ (The Men who killed Gandhi) या पुस्तकात उल्लेख केलेल्या घटना आणि गांधीजींच्या हत्येवेळी हिंदुस्थानातील परिस्थिती यांचे चित्रण असणार आहे.

‘इतिहास मला मोहिनी घालतो. लगे रहो मुन्नाभाईच्या चित्रिकरणावेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहताना गांधींजींच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडत होता. आज १२ वर्षांनी, गांधीहत्येवर वेब सिरिज बनवण्यासाठी विक्रम मल्होत्राने मला विचारणा केली आणि मी लगेचच होकार कळवला. यानिमित्ताने दुसरी बाजू समजून घेण्याची संधी मिळाल्याचा मला नक्कीच आनंद आहे. नाण्याची ही दुसरी बाजू मी योग्यरित्या प्रेक्षकांसमोर मांडू शकेन, अशी आशा आहे,’ असे राजेश मापुसकर म्हणाले.