साप्ताहिक राशिभविष्य – 06 ते 12 एप्रिल 2019

2
  • मानसी इनामदार

मेष – यश मिळेल
हा आठवडा तुमचे वैयक्तिक संबंध सुधारणारा ठरेल. तुमच्या एखाद्या नात्यात मनाविरुद्ध काही दुरावा आला असेल तर तो नक्कीच दूर होईल. हाती यश येईल. नोकरी उद्योगाच्या ठिकाणी थोडे संमिश्र ग्रहमान. पांढरा रंग परिधान करा.
शुभ परिधान – पैठणी वस्त्र, सोन्याची अंगठी

वृषभ – परदेशगमनाचा योग
तुम्ही अत्यंत कार्यमग्न असता. पण या आठवडयात स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी मिळेल. ती हाताची दवडू नका. कुटुंबियांसमवेत राहा. परदेशगमनाचा योग आहे. नवविवाहितांसाठी उत्तम काल. केशरी रंग तुमच्या सहजीवनासाठी शुभ ठरेल.
शुभ परिधान – पारंपारिक पोशाख, रुद्राक्ष

मिथुन – नवउद्योगाची संधी
नवीन उद्योग सुरु करण्यास उत्सुक असाल तर प्रयत्न करा. यश मिळेल. भागीदारीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी रोज थोडे गुलाब जल शिंपडा. वातावरण शांत आणि थंड राहील. कामावर जाताना जवळ गुलाबाचे फुल ठेवा.. लाल रंग वापरा.
शुभ परिधान – लाल जॅकेट, खणाची साडी

कर्क – वाहन सौख्य
तुमचे चंद्रबळ नेहमीच प्रभावी ठरते. गणपतीची उपासना करा. मानस पूजेवर भर द्या. तब्येतीची काळजी घ्या. वाहन सौख्य लाभेल. वाहन खरेदीचे योग आहेत. या आठवडयात झालेला व्यवहार खूप फलदायी ठरेल. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रेशमी कुर्ता, हिरवे उपवस्त्र

सिंह – अभंग ऐका
आठवडा सगळ्याच बाबतीत अत्यंत अनुकूल आहे. ज्या कामात हात घालाल त्यात यश मिळेल. घरी पाहुणे येतील. पैसे खर्च होतील पण मन प्रसन्न राहील. हरिपाठाचे अभंग ऐका किंवा म्हणा. काळपट हिरवा रंग शुभ ठरेल. लहान मुलांचे लाड करा.
शुभ परिधान – चांदीची जोडवी, हातात कडे

कन्या – गुंतवणूक करा
क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. मुलांनी आणि विशेषतः एखाद्या क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित करावे. आरोग्यात सुधारणा होईल. एखाद्या गोष्टीत ध्येय निश्चित करा. आकाशी रंग जवळ ठेवा. महिलांसाठी आठवडा चांगला. एखाद्या नवीन गोष्टीत गुंतवणूक करा.
शुभ परिधान – पंजाबी ड्रेस, मोत्याचा सर

तूळ – शांतता राखा.
तुमचा आततायी स्वभाव बऱयाचदा तुमची मनःशांती भंग करतो. पाण्यात सब्जाचे बी घालून ते पाणी नियमित प्या. महिलांनी आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. घरात दह्याचा पदार्थ आठवडयातून एकदा तरी बनवावा. मोतिया रंग धारण करा.
शुभ परिधान – रेशमी मोतिया साडी, रेशमी झब्बा

वृश्चिक – विवाह जमेल
घरातील देवांसाठी नवीन खरेदीचे योग आहेत. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. अविवाहितांना स्थळे येतील. त्यातूनच विवाह जमेल. फिकट हिरवा रंग जवळ ठेवा. मंगळाचे प्राबल्य असलेली तुमची रास आहे. तप्त स्वभावाला मुरड घाला.
शुभ परिधान – मोत्याची नथ, तांब्याचे कडे

धनु – नवनिर्मितीचा आनंद
पाठीची काळजी घ्या. अचानक दुखणे उद्भवू शकते. वाहन चालविण्याचा योग येईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांवर विसंबून राहू नका. नवनिर्मितीचा आनंद घ्याल.. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. पिवळा रंग परिधान करा. नवीन कामाची संधी दवडू नका.
शुभ परिधान – शेवंतीची फुले, मनगटी घडयाळ

मकर – देवळात जा
घरात शुभ कार्य संभवते. वातावरण प्रसन्न राहील. शुभ कार्य करण्यापूर्वी देवळात जाऊन गणपतीचे दर्शन घ्या. घरातील केरसुणीला तेल वाहा. लक्ष्मी प्रसन्न होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नांना यश मिळेल. अबोली रंग फलदायी.
शुभ परिधान – पूर्ण बाह्यांचा शर्ट, खणाची चोळी

कुंभ – गोडवा वाढेल
पत्नी सौख्य लाभेल. तिच्यासाठी एखादी भेटवस्तू आवर्जून खरेदी करा. त्यामुळे कामात यश मिळेल. पत्नीस चंदेरी रंगाची साडी घेऊन द्या. आणि जोडीने देवदर्शनास जा. नात्यातील गोडवा वाढेल. काहीतरी गोड दोघे मिळून खा.
शुभ परिधान – ब्रेसलेट, रेशमी उपवस्त्र.

मीन – निरपेक्ष कर्मयोग
कामावर लक्ष द्या. घरातील लहानांचे लाड करा. इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. निरपेक्ष कर्मयोग हे कायम लक्षात ठेवा. नेकी कर दर्यामे दाल. या उक्तीचा प्रत्यय येईल.. पिवळा रंग धारण करा. नोकरीच्या ठिकाणी हितशत्रूंचा त्रास होईल. दुर्लक्ष करा.
शुभ परिधान – जॉर्जेटची साडी, हिरा

समस्या- हाती पैसे येऊनही टिकत नाही. घरात कायम लक्ष्मीचे वास्तव्य राहावे यासाठी काय करू? – नीता देसाई, पुणे
तोडगा – सकाळी लवकर उठून प्रवेशद्वाराच्या उंबरठयाची नीट स्वच्छता करून त्याची पूजा करावी आणि तांब्याच्या गडुतून उंबरठयावर थोडे पाणी शिंपडावे. परिस्थिती बदलेल.