आठवड्याचे राशिभविष्य- रविवार २६ ऑगस्ट ते शनिवार १ सप्टेंबर

>> नीलिमा प्रधान

मेष – कार्याला निश्चित दिशा मिळेल
मेषेच्या सप्तमेषात शुक्र प्रवेश आणि चंद्र – गुरू त्रिकोण योग होत आहे. तुमच्या कार्याला निश्चित दिशा मिळेल. प्रयत्नांचा वेग वाढवा. कुटुंबातील समस्येवर उपाय मिळेल. कोर्टकेसमध्ये मंगळवार, बुधवार अडचणी येऊ शकतात. घेतलेले परिश्रम सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल.
शुभ दिनांक – 26, 27.

वृषभ – दगदग वाढेल
वृषभेच्या षष्ठात शुक्र प्रवेश आणि सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात विरुद्ध लिंगी व्यक्तींकडून मनस्ताप होण्याचा संभव आहे. शुक्रवार, शनिवार कायद्याच्या कचाटय़ात अडकण्याची शक्यता आहे. सावध रहा. जीवनसाथीची मर्जी राखा. दगदग वाढेल.
शुभ दिनांक – 26, 27

मिथुन – वर्चस्व वाढेल
मिथुनेच्या पंचमेषात शुक्र प्रवेश आणि चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तेथे तुमचे वर्चस्व वाढेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. योजना लवकर पूर्ण करा. नोकरीत बढती व बदल होऊ शकेल. परदेशगमनाची संधी लाभेल. कुटुंबातील प्रश्न मार्गी लागेल.
शुभ दिनांक – 27, 28

कर्क – वाहन जपून चालवा
कर्केच्या सुखस्थानात शुक्राचे राश्यांतर, बुध-गुरू केंद्र योग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ करावी लागेल. वाहन जपून चालवा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. कलाक्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. थोरामोठय़ांचा संबंध वाढेल. भविष्यात मोठा फायदा होईल.
शुभ दिनांक – 29, 30

सिंह – प्रेमाला चालना मिळेल
सिंहेच्या पराक्रमात शुक्र प्रवेश, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. कुटुंबात महत्त्वाची घटना घडेल. संतती प्राप्तीसंबंधित प्रयत्न यशस्वी होईल. व्यवसायात बुधवार, गुरुवार मिळणारी संधी विचारपूर्वक घ्या. प्रेमाला चालना देणारी घटना घडेल. वास्तू, जमीन इत्यादी मोठी खरेदी करता येईल.
शुभ दिनांक – 26, 27

कन्या – कठीण परीक्षेचा आठवडा
कन्येच्या धनेषात शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत करावी लागेल. वरिष्ठांचा दबाव राहील. स्पष्टवक्तेपणाचा डाव उलटवण्याचा प्रयत्न होईल. आत्मविश्वास व जिद्द ठेवा. अहंकाराने मात्र सर्व काम बिघडेल. कठीण परीक्षेचा आठवडा आहे.
शुभ दिनांक – 29, 30

तूळ – सुखद घटना घडू शकेल
स्वराशीत शुक्र प्रवेश, बुध-गुरू केंद्र योग होत आहे. कुटुंबात एखादी सुखद घटना घडण्याची आशा निर्माण होईल. दडपण कमी होऊ शकेल. व्यवसायात सुधारणा होईल. मंगळवार, बुधवार तणावाचा प्रसंग येईल. रेंगाळलेला नोकरीचा प्रश्न सुटेल. कोर्टाच्या कामात थोरामोठय़ांचे सहकार्य मिळवता येईल.
शुभ दिनांक – 31, 1

वृश्चिक – वेळेला महत्त्व द्या!
वृश्चिकेच्या व्ययस्थानात शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात योग्य निर्णय घ्या. राजकीय – सामाजिक क्षेत्रांत वर्चस्व राहील. मात्र लोकांचा विरोध वाढू शकतो. आप्तेष्टांसाठी वेळ व पैसा खर्च करावा लागेल. वेळेला महत्त्व द्या. कारण ती कोणासाठीच थांबत नसते.
शुभ दिनांक – 25, 30

धनु – पुरस्कार मिळेल
धनु राशीच्या एकादशात शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायातील गुंता सोडविण्याचा उपाय मिळेल. सप्ताहाच्या अखेरीस भागीदारांबरोबर एकमत होईल. आप्तेष्टांमधील वाटाघाटींसंबंधित तक्रार दूर करण्याची हीच योग्य वेळ असेल. कला-क्रीडा क्षेत्रांत पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल.
शुभ दिनांक – 27, 28

मकर – जिद्दीने पुढे जाता येईल
मकरेच्या दशमेषात शुक्राचे राश्यांतर, बुध-गुरू केंद्र योग होत आहे. टीका करताना सावध राहा. तुमच्या कार्यातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न होईल. जिद्दीने पुढे जाता येईल. जुने मित्र नव्याने संबंध जोडतील. कोर्टाच्या कामात इतरांची मदत मिळणे कठीण आहे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. जनतेचे प्रेम मिळेल.
शुभ दिनांक – 28, 29

कुंभ – जे ठरवाल ते कराल
कुंभेच्या भाग्येषात शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुम्ही जे ठरवाल ते तुमच्या क्षेत्रात करू शकाल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. स्वतःचे अस्तित्व अधिक तेजस्वी करता येईल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. परदेशात नवीन कामाची सुरुवात करता येईल. गुप्तशत्रूंना ओळखून ठेवा.
शुभ दिनांक – 28, 1

मीन – नम्रता ठेवा
मीनेच्या अष्टमात शुक्राचे राश्यांतर, सूर्य-चंद्र षडाष्टकयोग होत आहे. एखादे प्रकरण त्रासदायक ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत दिग्गजांची भेट होईल. तुमचे कौतुक होऊ शकेल. विरोधक मात्र वरिष्ठांचे कान भरण्याचा प्रयत्न करतील. नम्रता ठेवा. सभ्यपणे व प्रेमळपणे वागा.
शुभ दिनांक – 29, 30