दुसरे सत्र सुरू झाले तरीही निम्म्याहून अधिक शाळांमध्ये ‘वजनकाटा’ पोहोचलाच नाही

मेघा गवंडे-किटे ,मुंबई

शाळा सुरू झाल्यापासून प्रत्येक महिन्यात शिक्षणाधिकाऱयांमार्फत होणाऱया दप्तर ओझे तपासणीत शिक्षण विभाग नापास झाल्याचे उघड झाले आहे. मुंबई विभागातील एकूण १ हजार १६ शाळांपैकी निम्म्याहून अधिक शाळांमध्ये शिक्षण विभागाचा ‘वजनकाटा’ पोहचलेलाच नाही. महापालिका शिक्षण विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे ४४९ आणि ५३० शाळांमधीलच विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची तपासणी केली असून यात ऑगस्टमध्ये ५३ आणि सप्टेंबरमध्ये १२७ विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे शिक्षण विभागाने दिलेल्या निकषापेक्षा जास्त असल्याचा दावा तपासणी अधिकाऱयांनी केला आहे.

यंदा जूनमध्ये शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ जूनला जारी झालेल्या जीआरमध्ये प्रत्येक महिन्यात शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे तपासणार असे म्हटले होते, पण या जीआरला शिक्षण विभागातील अधिकाऱयांनी पहिल्याच महिन्यात हरताळ फासला. जून सोडाच, पण जुलैमध्येही दप्तराचे ओझे तपासलेले नाही. महापालिका शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक कार्यालयात पाठवलेल्या अहवालात केवळ ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील दप्तरओझे तपासणीचीच माहिती देण्यात आली आहे. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याच्या तपासणीसाठी एकूण ७७ अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली होती. पण या अधिकाऱयांची तपासणी मोहीम तोकडी पडली आहे.

३५ हजार ५०० विद्यार्थ्यांचे दप्तर ‘परफेक्ट’

महापालिका शिक्षण विभागाने ऑगस्टमध्ये केलेल्या तपासणीसाठी उपस्थित ३५ हजार ७४४ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ४९१ विद्यार्थ्यांचे तर सप्टेंबरमध्ये केलेल्या तपासणीत ३४ हजार ५९९ विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार ११६ विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शिक्षण विभागाच्या निकषानुसार ‘परफेक्ट’ असल्याने अहवालात म्हटले आहे.

तपासणी अहवालही चुकीचा

महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठविलेल्या ऑगस्ट महिन्याच्या अहवालात चुका आहेत. पूर्व उपनगरातील ३४० शाळांपैकी ऑगस्टमध्ये १२६ शाळांमध्ये तपासणी झाली. यात दप्तर ओझे तपासलेल्या ३० हजार २६ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ८२५ विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन प्रमाणात असल्याचे लिहिले आहे. मात्र वजन जास्त असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण शून्य दर्शविले आहे. हे प्रमाण २०१ असायला हवे होते.