भाजपची ‘एक्सपायरी डेट’ संपली; ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर हल्ला

50

सामना ऑनलाईन । कोलकाता

कोलकातामध्ये विरोधी पक्षांच्या महारॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला. मोदी सरकार आणि भाजपची ‘एक्सपायरी डेट’ संपली आहे असे बॅनर्जी म्हणाल्या. सर्व विरोधी पक्ष एकदिलाने आणि एकजुटीने काम करत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर आम्ही चर्चा करू, आता फक्त भाजपचा पराभव हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांवर सीबीआय आणि ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. भाजपने कोणालाच सोडले नाही. आम्हीही त्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

कोणावरही व्यक्तीगत टीका करण्याची आमची संस्कृती नाही. मात्र, भाजपने कोणालाच सोडले नाही. तुमच्या बरोबर आले, ते सर्व चांगले. ज्यांनी तुमची साथ सोडले ते सर्व चोर अशी भाजपची भावना आहे. त्यामुळे त्यांनी विरोधकांच्या मागे सीबीआय आणि ईडीचा ससेमिरा लावला आहे. आम्ही याचा योग्य तो समाचार घेऊ असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही संविधान बदलले, इतिहास बदलला, भूगोल बदलला आता आम्ही बदल करणार आहोत. जनतेची साद एकून आम्ही मोदी सरकार बदलणार आहोत असे त्या म्हणाल्या. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदी यांनी निवडणुकीच्या आधी दिले होते. मात्र, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर लाखो तरुणांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी एका शयरीतून मोदी सरकरावर बोचरी टीका केली.

महाआघाडीचा नेता कोण असेल असा सवाल भाजप करत आहे. मात्र, आमचा नेता कोण असेल याबाबत आमच्यात कोणेतही मतभेद नाहीत. महाआघाडीतील प्रत्येक घटक हा नेता आहे. मात्र, तुमच्या पक्षाची अवस्था निर्नायकी झाली आहे. तुमच्या पक्षात फक्त अध्यक्ष आणि पंतप्रधानच दिसतात. इतर नेते कोठे आहेत असा सवालही त्यांनी केला. आधी प्रत्येकाच्या मनात सीबीआयबाबत आदराची भावना होती. भाजप सरकारने तो आदरच नष्ट केला आहे. महाआघाडीचा नेता आणि पंतप्रधान कोण असेल हा आमचा मुद्दा नसून भाजपचा पराभव हेच आमचे ध्येय आहे. भाजपला सत्तेतून हाकलल्यावर पंतप्रधानपदाबाबत महाआघाडीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. भाजपची त्याची चिंता करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या