‘या’ गावात लागले वड आणि पिंपळाचे लग्न

113

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालच्या कोलकातापासून 15 किलोमीटरवर असलेल्या सोडेपूर गावात एक लग्न लागले. त्यात वधू आणि वर दोघेही अल्पवयीन होते आणि विशेष म्हणजे वड आणि पिंपळ या झाडांचे लग्न लावण्यात आले. या अनोख्या लग्नासाठी भटजी, वाजंत्री, वधूपक्ष,वरपक्ष आणि सुमारे दोन हजार वऱ्हाडीही हजर होते. लग्नानंतर गावकऱ्यांनी वधू-वरांची देखभाल करण्याचे आश्वासन देत या नवविवाहित वृक्षांसोबत सेल्फीही काढला.

नागप्रणय हा 12 वर्षांचा असून त्याच्यापेक्षा देवराती ही दोन वर्षांनी लहान आहे. अगदी जन्मापासूनच देवराती या पिंपळाच्या वृक्षाने नागप्रणय या वडाची झाडाची साथ दिली आहे. ग्रामस्थांचीही या दोन झाडांकडे विशेष ओढ आहे. हे वृक्ष प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात असे ग्रामस्थांनी सांगितले. आपल्या आवडीच्या या दोन वृक्षांचे लग्न लावण्याचा विचार काही ग्रामस्थांनी मांडला. त्याला सगळ्यांनी साथ दिली. लग्नाचा मूहूर्तही ठरला. वरपक्षाचे पालकत्व सोमा आणि सुप्रकाश यांनी स्वीकारले. तर वधूपक्षाचे पालकत्व सुनीती सरकार आणि कमल यांनी स्वीकारले. सुमारे दोन हजार वऱ्हाडींना निमंत्रणेही पाठवण्यात आली. बुधवारी सकाळपासून नागप्रणयच्या सावलीत वाजंत्री वाजायला सुरुवात झाली. तर दुसरीकडे देवरातीला सजवण्याची लगबग सुरू होती. लग्नासाठी नागप्रणयला धोती-कुर्ता घालण्यात आला होता. तर देवरातीने बनारसी शालू नसेला होता. दोघांमध्ये असलेल्या सहा फूटांच्या अतंरात आंतरपाटही धरण्यात आला होता. मूहूर्ताची वेळ झाल्यावर शंख वाजवून भटजींनी मंत्रोच्चार सुरू केले. दोघांचे लग्न लागल्याचे जाहीर करण्यात आले.

या लग्नानंतर या दोन्ही वृक्षांना सजवण्यात आले. गावकऱ्यांनी नवविवाहित वृक्षांची भेट घेऊन त्यांची देखभाल करण्याचे आश्वासन एकमेकांना देत वृक्षांसोबत सेल्फीही काढले. त्यानंतर आलेल्या वऱ्हाडींना मेजवानी देण्यात आली आणि गावात मिठाई वाटून या अनोख्या लग्नाचा आनंद साजरा करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या