बंगालमध्ये भाजप कार्यकर्ते रस्त्यावर; संघर्ष चिघळला


सामना ऑनलाईन। कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष उसळला आहे. मालदा येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आशिष सिंह या भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. त्यातच कोलकातामध्ये भाजप कार्यकर्ते बंगाल पोलिसांविरोधात विरोध प्रदर्शन करत रस्त्यावर उतरले आहेत. भाजप कार्यकर्ते विरोध प्रदर्शन करण्यासाठी आक्रमक झाल्याने पश्चिम बंगालमधील परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. भाजपच्या आंदोलनामुळे बंगालमध्ये कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी आशिष अचानक मालदा येथून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. पण बुधवारी त्यांचा मृतदेह इंग्लिश बाजार पोलीस ठाणे हद्दीतील बाधापुकूर येथे सापडला. मृतदेहावर जखमांचे व्रण असल्याने आशिष यांची हत्या झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आशिष यांचा मृतदेह सापडल्यानंतर भाजप कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले असून शेकडोंच्या संख्येने त्यांनी पोलिसांना घेरले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत. आशिष यांच्या हत्येप्रकरणी भाजप कोलकातामध्ये विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि पोलिसांच्या मनमानीविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्ते अधिकच चवताळले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याचा वापर केला. मात्र, तरीही कार्यकर्ते मागे हटत नसल्याने पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. पोलिसांनी सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिकेट्सही भाजप कार्यकर्त्यानी उखडल्या आहेत. भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.