इंग्लंडच्या कर्णधाराला ‘गे’ म्हटल्याने विंडीजचा गोलंदाज वादाच्या भोवऱ्यात

1

सामना ऑनलाईन । सेंट ल्युसिया

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या कसोटी सामन्याला लैंगिक शेरेबाजीमुळे गालबोट लागले आहेत. या सामन्या दरम्यान वेस्ट इंडिजचा गोलंदाज शॅनन गॅब्रियलने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला ‘गे’ म्हटल्याने वाद सुरू झाला आहे. या प्रकरणी आयसीसीने गॅब्रियल विरोधात चुकीच्या भाषेचा प्रयोग केल्याचा आरोप केला आहे. यावर सामन्यातील पंचांसोबत चर्चा केल्यानंतर गॅब्रियलला शिक्षा सुनावण्यात येईल.

वेस्ट इंडिज व इंग्लंडमध्ये सेंट ल्युसिया येथे तिसरा कसोटी सामना सुरू होता. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रूट मैदानावर फलंदाजी करत होता. वेस्ट इंडिजने 2-0 ने ही मालिका आधीच खिशात टाकली होती. तर विडींज इंग्लंडला त्यांच्या देशात व्हाईट वॉश देण्यास उत्सुक होती. तिसऱ्या सामन्यात इंग्लंड भक्कम स्थितीत होती. त्यामुळे वेस्ट इंडिजचा गोलंदाज शॅनन गॅब्रियल थोडा चिडला होता. त्याचा हा राग मैदानावरील इंग्लंडच्या कर्णधारावर निघाला. त्याने जो रुटला ‘गे’ असे म्हणत काही तरी शेरेबाजी केली. शॅननची टीका स्टम्प्समधील माईकमध्ये रेकॉर्ड झाली नाही. मात्र त्यानंतर जो रुटने ‘गे असण्यात काही चुकीचे नाही. त्यामुळे तो शब्द अपमान केल्यासारखा वापरू नकोस’ असे सुनावले. जो रुटचे हे वाक्य माईकमध्ये रेकॉर्ड झाले व त्यावरून गॅब्रियलने केलेली टीका समोर आली.

या प्रकरणी आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टमधील आर्टिकल 2.13 अंतर्गत गॅब्रियल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मॅच रेफरी जेफ क्रो यांच्यासोबत चर्चा होणार असून त्यानंतर गॅब्रियलवर पुढील कारवाई करण्यात येईल. मात्र यात गॅब्रियल दोषी आढळला तर त्याच्या दोन कसोटी किंवा चार एक दिवसीय सामन्यांची बंदी तसेच मॅच फी कापण्यात येण्याची शिक्षा होऊ शकते.