वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडीज ठरणार ‘डार्कहॉर्स’?

7

सामना ऑनलाईन । लंडन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर एकेकाळी निर्विवाद वर्चस्व गाजवणारा वेस्ट इंडीजचा संघ यंदाच्या आयसीसी विश्वचषकात ‘डार्कहॉर्स’ ठरू शकतो असा अंदाज अनेक क्रिकेटतज्ञ व्यक्त करीत आहेत. विंडीजच्या वर्ल्ड कप संघात सामन्याचा निकाल बदलू शकणारे ख्रिस गेल, आंद्रे रसेलसारखे ‘पॉवर हिटर’ असून दिग्गज संघांनीही त्या दृष्टीने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे.

विंडीजचा संघ हळूहळू ‘बॅडपॅच’मधून बाहेर येत आहे. अलीकडच्या काळात कर्णधार जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली संघाने आपली कामगिरी उंचावली आहे. त्यात नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत आंद्रे रसेलने तडाखेबंद खेळी करत गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. गेल आयपीएलमध्ये फारसा चमकला नसला तरी वर्ल्ड कपमध्ये त्याचा खेळ उंचावल्यास त्याला रोखणे विरोधी संघांना कठीण जाणार आहे. याशिवाय शैलीदार फलंदाज डेरेन ब्रावो, अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेट, युवा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर यांच्या समावेशामुळे हा संघ अधिक मजबूत झाला आहे.
छोटय़ा मैदानांचा स्फोटक फलंदाजांना लाभ

इंग्लंडमध्ये मैदानं तुलनेने छोटी आहेत. त्यात पाटा खेळपट्टय़ांमुळे गोलंदाजीला तितकीशी मदत मिळणार नाही. त्याचा पुरेपूर फायदा विंडीजचे स्फोटक फलंदाज उठवू शकतात. जागतिक क्रमवारीत विंडीजचा संघ आठव्या स्थानी असला तरी हा संघ वर्ल्ड कप विजेतेपदाच्या शर्यतीत नक्कीच असणार हे सगळय़ांचंच मत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या