वेस्टर्नच्या प्रवाशांचा लेटमार्क, सिग्नल यंत्रणेतील बिघाडाने सेवा कोलमडली

7

सामना प्रतिनिधी, मुंबई

गोरेगाव रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेच्या सर्व उपनगरीय मार्गाची वाहतूक बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी तब्बल 45 मिनिटे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या बिघाडाचा परिणाम दुपारी उशिरापर्यंत राहिल्याने 50 लोकल फेऱया रद्द करण्यात येऊन 150 फेऱयांना लेटमार्क बसला.

पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेत सकाळी 7.05 वाजता मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची जलद आणि धिम्या मार्गावरील वाहतूक बाधित झाली. तब्बल 45 मिनिटांनंतर सकाळी 7.50 वाजता हा बिघाड दूर करण्यात यश आले. त्यानंतर हळूहळू पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली, परंतु या बिघाडाचा प्रभाव दुपारी उशिरापर्यंत राहिल्याने पश्चिम रेल्वेच्या लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांनी ट्रकमध्ये उतरत तंगडतोड करीत नजीकचे स्थानक गाठत पुढील प्रवास बेस्ट, टॅक्सी वा खासगी टॅक्सींचा आधार घेतला. त्यामुळे बेस्टच्या बसेसनाही गर्दी वाढली. घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱया मेट्रोचाही आधार प्रवाशांनी घेतल्याने तेथेही गर्दीत वाढ झाली.

ओला आणि उबेरना मागणी वाढली
ओला व उबेर या खासगी मोबाईल ऍप आधारित गाडय़ांची मागणी वाढल्याने त्यांच्या वाढीव दराचा फटका प्रवाशांना बसला. आधीच मेट्रोची कामे त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी असल्याने भरवशाच्या लोकलनेच दगा दिल्याने प्रवाशांना कामावर पोहचण्यास उशीर झाल्याने लेटमार्क बसला. या गोंधळाचा परिणाम दिवसभर राहिल्याने पश्चिम रेल्वेच्या लोकल दुपारी उशिरापर्यंत लेट धावत होत्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या 50 लोकल फेऱया रद्द करण्यात आल्या. त्यामुळे तर 150 लोकल फेऱयांना लेटमार्कचा सामना करावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या