हॅट्ट्रिकचे श्रेय धोनीला – कुलदीप

सामना ऑनलाईन । कोलकाता

कोलकाता येथे झालेल्या हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक घेणा-या कुलदीप यादवने आपल्या ऐतिासिक कामगिरीचे श्रेय यष्टीरक्षक धोनीला दिले आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक करणारा कुलदीप हा तिसरा हिंदुस्थानी खेळाडू आहे. कुलदीपच्या आधी कपिल देव आणि चेतन शर्मा या दोघांनी हा पराक्रम केला होता. पहिल्या सामन्यापासूनच प्रत्येक चेंडूवर मार्गदर्शन करणाऱ्या धोनीचा हॅटट्रिकमध्ये मोलाचा वाटा आहे असेही कुलदीप म्हणाला.

कोलकात्याच्या ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर २५३ धावांचे लक्ष ठेवले होते. परंतु ३०व्या षटकांत १३८ धावांवर ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मॅथ्यू वेड, अॅश्टन एगर यांच्यावर त्यांची भिती होती. परंतु कुलदीपने ३३व्या षटकात दोघांनाही लागोपाठच्या चेंडूत बाद करत माघारी पाठवले. आणि त्यानंतर पॅट कमिन्सला बाद करत त्याने हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला.

पहिल्या दोन खेळाडूंना लागोपाठ बाद केल्यानंतर माझ्या मनातील धाकधूक वाढली. पुढील चेंडू कसा टाकू याच संभ्रमात मी होतो म्हणून मी धोनीकडे जाऊन त्याचा सल्ला घेतला. धोनीला मी कशाप्रकारे चेंडू टाकावा असे विचारले तेव्हा त्याने माझे मनोबल वाढवले’; असे कुलदीप म्हणाला. ‘तुला जसा योग्य वाटतो त्याच पद्धतीने चेंडू टाक’ असे धोनीने सांगितले. धोनीच्या एका वाक्याने मला आत्मविश्वास दिला आणि त्या संधीचं मी सोनं केलं, अशा भावना कुलदीपने व्यक्त केल्या.

कुलदीपने आधी २०१४ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक केली होती. ईडन गार्डनवर हॅटट्रिक घेण्याची किमया हिंदुस्थानतर्फे फक्त कपिल देव या एकाच गोलंदाजाने केली होती. आता या यादीत कपिल सोबत कुलदीपचेही नाव दाखल झाले आहे.