व्हॉट्सअॅपनं उघड केलं नवऱ्याचं दुसरं लग्न


सामना ऑनलाईन । अंबाला

लग्न जुळवून देणाऱ्या मॅट्रीमोनी वेबसाइटस वरुन आजकालचे तरुण-तरुणी आपल्या जीवनातील साथीदाराचा शोध घेत असतात. पण अनेकदा या साइटवर असणारी प्रोफाईल ही स्वत:ची खरी नसतात किंवा ओळख लपवतात. अशीच एक घटना अंबाला येथे घडली असून दोन मुलांच्या बापाने स्वत:ला अविवाहित आहे असं सांगून शादी डॉक कॉमवर आपले खोटे प्रोफाईल बनवले आणि दुसरा विवाह केला.

नवीन हा अंबालातील खोजकीपूर येथे प्रोफेसर कॉलनीत राहत होता. नवीनने मॅट्रीमोनी साईटवर आपण अविवाहित असल्याचे प्रोफाईल बनवले होते. याची त्याच्या पत्नीला जराही नव्हती. १६ एप्रिल पासून तो घरातून बेपत्ता झाल्याने त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली होती. परंतु नवीनने अविवाहित असल्याचे आपल्या प्रोफाइलमध्ये दाखवल्याने आग्रा येथे राहणाऱ्या एका तरुणीशी त्याची ओळख झाली. वेळेचा विलंब न लावता २४ मेच्या दिवशी नवीनने मथुरेला जाऊन त्या तरुणीशी लग्न केले. नवीनने आपली पहिली बायको वंदना हिच्या व्हॉट्सपवर नंबरवर एक फोटो पाठवला होता व त्या मध्ये तो दुसऱ्या महिलेबरोबर आहे हे तिने पाहिले. नवीनच्या बायकोने हा फोटो बघितल्यावर तिला धक्काच बसला व तिने पोलिसांकडे पुन्हा धाव घेतली.

नवीने या दुसऱ्या बायकोला आपल्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितले नसून तो तिच्याबरोबर अंबालातील लालकुर्ती येथील एका भाड्याच्या खोलीत लपून राहत होता. काही दिवसांअगोदर त्याची पहिली पत्नी वंदना हिच्या नातेवाईकांनी ही त्या दोघांना तेथील गुरुद्वारात बघितले होते. या नंतर पोलिसांकडे वंदनाने पुन्हा एकदा तक्रार केली. पोलिसांनी नवीनला त्याच्या दुसऱ्या पत्नीबरोबर चोरून राहत असलेल्या ठिकाणाहून अटक केली. वंदनाने पोलिसांना आपले लग्न नवीनशी २००३ साली ३ सप्टेंबरला झाले असून आपल्याला एक मुलगा व एक मुलगी असल्याच सांगितलं आहे.