अॅपल कार प्लेवर व्हॉटस् अॅप

  • स्पायडरमॅन

व्हॉटस् अॅप हा सध्या जगाच्या संदेश दळणवळणाचा प्रमुख भाग बनला आहे. आपल्या फोनवर व्हॉटस् अॅप वापरत नसलेली व्यक्ती आता दुर्मिळ म्हणावी अशा गटात मोडता येईल. याच व्हॉटस् अॅपच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या उद्देशाने अॅपलने आपल्या कार प्लेवर व्हॉट्स अॅपला स्थान दिले आहे. त्यामुळे आता आपल्या कारच्या डॅश बोर्डवरदेखील आपल्याला व्हॉटस् अॅपचा वापर सहजपणे करता येणार आहे. यासाठी कारच्या इन्फोटेन्मेंट सिस्टीमच्या क्रीनवर तुम्हाला एक व्हॉटस् अॅपचा स्पेशल आयकॉनदेखील दिसणार आहे. ‘सिरी’ या व्हर्च्युअल असिस्टंटच्या माध्यमातून आपण व्हॉटस् अॅपवरील संदेश सहजपणे ऐकू शकणार आहोत आणि नवे संदेश टाइप करून पाठवूदेखील शकणार आहोत. व्हॉइस कमांडची सुविधा यासाठी प्रदान करण्यात आली आहे. व्हॉटस् अॅपच्या नव्या अपडेटद्वारे ही सुविधा चालू होणार आहे. सध्या जवळ जवळ सर्वच कारमध्ये इन्फोटेन्मेंट सिस्टीम असल्याने या सुविधेचा जास्तीत जास्त वापर होण्याची शक्यता आहे.

गुगल बिझनेस टूलच्या नियमात बदल
सध्याच्या ऑनलाइन व्यापाराच्या जमान्यात लहानमोठय़ा अशा अनेक कंपन्या इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांना जोडण्याच्या प्रयत्नात असतात. यासाठी अनेक वेबसाइट आणि बिझनेस टूल्सची मदत या कंपन्यांकडून घेतली जाते. गुगल बिझनेस टूलच्या माध्यमातूनदेखील अनेक कंपन्या ग्राहकांशी संपर्कात असतात. तसेच विविध उत्पादनांच्या शोधात असलेले ग्राहकदेखील इथे कंपन्यांशी संपर्क साधतात. यापूर्वी अशा उत्पादक कंपन्या शोधताना ग्राहकांना त्या कंपन्यांचे रेटिंग आणि त्या कंपनीविषयी लोकांची मते आणि अनुभव वाचता येत असत. यापूर्वी अशा कंपनीत काम केलेले कर्मचारी त्या कंपनीविषयीची आपली मते परखडपणे इथे मांडू शकत होते. मात्र आता गुगलच्या नव्या नियमानुसार कोणत्याही कंपन्यांचे जुने कर्मचारी त्या त्या कंपनीविषयी आपली नकारात्मक मते गुगल बिझनेस टूलवर मांडू शकणार नाहीत. अशा एखाद्या समीक्षेवर संबंधित कंपनीने आक्षेप घेतल्यास ती समीक्षा तातडीने हटवण्यात येईल.