तत्काळ व्हॉट्सऍप अपडेट करा!  मोबाईल कॅमेरा, माइकवर हल्ला

10

सामना प्रतिनिधी । सॅन फ्रॅन्सिस्को

जगातील सर्वात मोठा मेसेंजिंग ऍप अशी लोकप्रियता असलेल्या र्‍यांव्हॉट्सऍप’मध्ये झालेल्या थोड्या बिघाडामुळे हे ऍप वापरणार्‍यांचे मोबाईल धोक्यात आले आहेत. इस्रायलच्या एका स्पायवेअरच्या मदतीने केवळ एका व्हॉट्सऍप कॉलने या ऍपवरील अकाऊंट हॅक करता येणे सोपे झाले आहे. या कॉलमुळे युजर्सच्या मोबाईलचा कॅमेरा, मेसेजेस, लोकेशन आणि माइकवरही हॅकर डल्ला मारू शकणार आहे. व्हॉट्सऍपने आपला बिघाड दुरुस्त केला असून लवकरत लवकर हे ऍप अपडेट करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या युजर्सना केले आहे. त्यामुळे व्हॉट्सऍप वापरत असाल तर सावधान व्हा!

हा स्पायवेअर इस्रायलच्या सिक्रेटिव्ह एनएसओ ग्रुपने विकसित केला आहे. त्याद्वारे कुणालाही व्हॉट्सऍप मिस कॉल करूनही त्याच्या फोनमध्ये हा स्पायवेअर घालता येणार आहे. व्हॉट्सऍपने यानंतर प्रसिद्ध केलेल्या आपल्या पत्रकात म्हटले आहे की, ऍपमध्ये झालेला बिघाड आता सुधारण्यात आला आहे, पण त्यासाठी युजर्सना आपापले ऍप अपडेट करावे लागणार आहे. याबरोबरच मोबाईल वापरणार्‍यांनी आपला स्मार्टफोन नेहमी अपडेट ठेवायचा आहे.

इस्रायलच्या कंपनीचीच करामत

इस्रायलचा एनएसओ ग्रुप त्यांच्या सरकारसाठी काम करतो. वेगवेगळ्या ठिकाणाहून ऍप हॅक करून माहिती, डेटा जमविणे हे या ग्रुपचे मुख्य काम आहे. व्हॉट्सऍपने या ग्रुपचे थेट नाव न घेता म्हटले की, व्हॉट्सऍपवरील हा हल्ला एका खासगी कंपनीशी संबंधित आहे, जी कंपनी लोकांच्या फोनच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्यांच्या सरकारशी संबंधित स्पायवेअर टाकू शकते. दुसरीकडे, या एनएसओ ग्रुपने मात्र व्हॉट्सऍपचे हे आरोप स्पष्ट फेटाळून लावले आहेत.