कळविण्यास दु:ख झाले की…एक तास ‘तो’ मेला! जगभरात रडारड!!

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक गरजांच्या यादीत आता जणू ‘व्हॉटस् अॅप’चीही भर पडली आहे. म्हणूनच आज हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी या ‘व्हॉटस्अॅप’ नावाचा सखा सोबती तासाभरासाठी गतप्राण झाला आणि मग जगभरात रडारड झाली.

एकाही मेसेजची देवाणघेवाण होत नव्हती. व्हॉटस्अॅप कॉलही बंद झाले. व्हॉटस्अॅपला काय झाले, आपल्याच मोबाईलच्या अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा, अशी शंका प्रत्येक युजर्सला होती. सुरुवातीला कोणालाच काही अंदाज येत नव्हता. इंटरनेटमध्ये बिघाड नाही, ट्विटरही सुरू आहे, फेसबुक सुरळीत आहे, मग व्हॉटस्अॅपला काय झाले या विचाराने तरुण व तरुणी हैराण झाल्या. ट्विटर, फेसबुकवर चौकशा सुरू केल्या. ट्विटरवर #Whatsappdown असा हॅश टॅग ट्रेंड सुरू झाला. तासाभराने व्हॉटस्अॅपच्या आणि पर्यायाने युजर्सच्या जीवात जीव आला. व्हॉटस्अॅप अचानक ठप्प होण्यामागचे कारण रात्री उशिरापर्यंत कंपनीने जाहीर केले नाही.

मेमध्येही झाले होते बंद
व्हॉटस्अॅप अचानक बंद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मेमध्येही हिंदुस्थानच्या काही भागांत, मलेशिया, जर्मनी, ब्रिटनसह युरोपमधील अनेक देशांमध्ये काही काळ व्हॉटस्अॅप बंद झाले होते.

हिंदुस्थानात २० कोटींपेक्षा जास्त युजर्स
जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेले मेसेजिंग अॅप व्हॉटस्अॅपचे युजर्स दरवर्षी वाढत आहेत. २०१३ मध्ये हिंदुस्थानात केवळ २ कोटी लोकांकडे व्हॉटस्अॅप होते. चार वर्षांत फेब्रुवारी २०१७ मध्ये २० कोटी युजर्स झाले आहेत. हिंदुस्थानातील लोकसंख्येच्या १६.३२ टक्के लोकांकडे व्हॉटस्अॅप आहे.

  • ‘डाऊन डिटेक्टर’ या वेबसाईटने सर्वप्रथम ‘व्हॉटस्अॅप’ थंडावल्याची खबर जगाला दिली.
  • दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी हिंदुस्थानातील तमाम मोबाईलमधील व्हॉटस्अॅप मेसेज टोन बंद झाला.
  • ‘डाऊन डिटेक्टर’च्या म्हणण्यानुसार हिंदुस्थान, इंडोनेशिया, रशिया आणि मध्य आशियासह जगातील अनेक भागांतून व्हॉटस्अॅप बंद झाल्याच्या तक्रारी आल्या.
  • रोपात सर्वात जास्त तक्रारींची नोंद झाली. जगभरात व्हॉटस्अॅपचे १०० कोटींहून अधिक युजर्स आहेत. दर महिन्याला १ कोटी ३० लाख युजर्स यावर ऑक्टिव्ह असतात.
  • दररोज ५५ कोटी मेसेज पाठवले जातात. साडेचार कोटी फोटो दररोज शेअर केले जातात.

हा हा, ही ही, हू हू
 व्हॉट्सअॅप डाऊन झाला आणि कुटुंब एकत्र आले. मी फोनवर माझ्या कुटुंबियांशी पहिल्यांदाच इतके बोललो. – डॉ. जुनैद

पहिले आम्ही बाल्कनीतून शेजाऱ्यांची लाईट गेली का पहायचो. आज प्रत्येकजण ट्विटरवर जाऊन चेक करत होता.
– अभय रत्ना पांडे

कधी फोन न करणाऱ्यांनी व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर फोन करून विचारणा केली, ‘व्हॉट्सअॅप चालू आहे का?’ – बाबू मोशाय

व्हॉट्सअॅप डाऊन झाला कारण तिथे एक हिंदुस्थानी इंजिनियर काम करतो. त्याच्या गर्लफ्रेन्डने त्याला ब्लॉक केले आणि तो म्हणाला, ‘मी ब्लॉक तर सर्व ब्लॉक’!– चेतन भगत