व्हॉट्सअॅपमध्ये आलेले दोन नवे फिचर्स माहिती आहेत का?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय मॅसेंजिंग अॅप म्हणून ओळखलं जाणारं व्हॉट्सअॅप हे सातत्याने त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. आता ही व्हॉट्सअॅपने दोन भन्नाट फिचर्स आणले आहेत. व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये ‘मीडिया व्हिजीबिलीटी’ हे नवीन फीचर आले आहे. हे नवं फीचर व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड बीटा अॅपच्या २.१८.१९५ व्हर्जनवर उपलब्ध असणार आहे. या फीचरच्या नावातूनच हे फीचर नेमकं काय असेल याची कल्पना येते. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅपवरील मीडिया कन्टेन्टला गॅलरीमध्ये हाइड करता येणार आहे म्हणजे तो कन्टेन्ट लपवून ठेवता येणार आहे. यासोबतच आणखी एक ‘कॉन्टॅक्ट शॉर्टकट’ नावाचं नवीन फीचर आले आहे. या फीचरद्वारे व्हॉट्सअॅपवरून कोणत्याही नवीन कॉन्टॅक्टला अॅड करणे अधिक सोपे होणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये ‘कॉन्टॅक्ट शॉर्टकट’ हे फीचर आयफोन युजर्ससाठी आधीपासूनच उपलब्ध आहे.

नव्या ‘मीडिया व्हिजीबिलीटी’ या फीचरमुळे व्हॉट्सअॅपवर आलेले काही फोटो किंवा व्हिडिओ आपल्याला हवे आहेत की नको तसेच व्हॉट्सअॅपवर येणारा मीडिया कंटेंट तुम्हाला गॅलरीत हवा आहे की, केवळ व्हॉट्सअॅपवर ठेवायचा आहे हे ठरवता येणार आहे. व्हॉट्सअॅप युजरने ‘मीडिया व्हिजीबिलीटी’ हा ऑप्शन डिसेबल केल्यास मीडिया कंटेंट गॅलरीत दिसणार नाही. ‘मीडिया व्हिजीबिलीटी’ हे फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये बाय डिफॉल्ट इनेबल असणार आहे. मात्र तुम्ही व्हॉट्सअॅपच्या सेटींगमध्ये जाऊन डेटा आणि स्टोरेज यूजेसवर क्लिक करुन या पर्यायला डिसेबल करू शकता. या फिचर सोबतच ‘कॉन्टॅक्ट शॉर्टकट’ नावाचं नवं फीचरही आलं आहे. या फीचरमध्ये व्हॉट्सअॅपवर अगदी सहजपणे कॉन्टॅक्ट अॅड करू शकता. एखादा नवीन ग्रुप तयार करत असताना त्यातील सदस्य तुमच्या मोबाइलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणं पूर्वी गरजेचं होतं, मात्र आता फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर नवीन कॉन्टॅक्ट तयार करू शकता. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरची मजा लेटेस्ट व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन डाऊनलोड करून घेता येणार आहे.