रायगडमध्ये पहिल्यांदाच घेतले गव्हाचे पीक: चरीच्या शशिकांत थळे यांचा यशस्वी प्रयोग

1

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होता. मात्र आता भाताची लागवड कमी झाली असल्याने अनेक भागात शेती लावणेही बंद झाले आहे. भात पिकाशिवाय इतर पिके शेतात लावण्याचा प्रयत्न मोजकेच शेतकरी करीत असतात. असाच एका ध्येयवेडा शेतकरी शशिकांत थळे याने चक्क गव्हाचे पीक घेऊन गहू सुद्धा रायगडच्या शेतात पिकू शकतो हे दाखवून दिले आहे. शशिकांत याने हा प्रयोग करून यशस्वी झाला असून दोन गुंठे शेतातून त्याने 35 किलो गव्हाचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात गव्हाच्या शेतीचा प्रयोग पहिल्यांदाच केला असून तो यशस्वीही झाला आहे.

शशिकांत थळे याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. घरची शेती असल्याने शेताच्या कामाची त्यांना आवड आहे. त्यांच्या मालकीची सव्वा एकर भातशेती आहे. वडीलांकडून शेतीचे धडे घेऊन शेतीवर नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न शशिकांत थळे हे शाळेत असल्यापासून करीत आहेत. वडीलांच्या निधनानंतर शेतीची पुर्ण जबाबदारी शशीकांत थळे यांनी खांद्यावर घेऊन शेतामध्ये भाताबरोबरच अन्य पिकांची लागवड करण्याचा प्रयत्न केला. भाताबरोबरच तोंडली, कारले, दुधी, चवळी, हरभरा, वाल, मुग, वांगी, मुळा, अशा अनेक प्रकारच्या पिकांची लागवड ते आपल्या शेतात करतात. त्यातून त्यांना चांगला फायदा मिळाला असून शेतीचा खर्च वजा करून लाखो रुपयांचे उत्पादन मिळविले.

आपल्या शेतात भात शेतीबरोबर भाजी, कडधान्य याचे पीक घेत असताना गव्हाचे पीक शेतात घेण्याबाबत गावातील त्याचे मित्र प्रमोद जाधव यांनी कल्पना सुचवली. प्रमोद जाधव हे सध्या सिंधूदूर्गमध्ये समाजकल्याण विभागात उपआयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यानुसार शशिकांत यांनी प्रमोद जाधव यांच्याकडून गहू शेतीबाबत योग्य ती माहिती करून घेतली. त्यानंतर शशिकांत थळे यांनी गव्हाच्या जातीबाबत अभ्यास केला. त्यावेळी गव्हाचे शरबती, बन्सी, व खपली अशा तीन मुख्य जाती आहेत याची माहिती मिळाली.

शरबती गव्हाची लागवड व उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मात्र अधिक पौष्टीक असणार्‍या बन्सी व खपली गव्हाची लागवड कमी प्रमाणात होते. बन्सी गव्हामध्ये प्रथिने व बीटा कॅरोटीचे प्रमाणात जास्त आहे. परदेशात बन्सी गव्हाला अधिक मागणी आहे. गव्हाच्या पिकाला थंडीची जास्त गरज असते. त्यामुळे देशावर याची लागवड अधिक होते. कोकण हा भाग समुद्रकिनारी असल्याने खारे वारे व मतलई वार्‍यांमुळे थंडीचे प्रमाण कमी असते. परंतू चरी येथील शेतकरी शशीकांत थळे यांनी बन्सी गव्हाची लागवड करण्याचा निर्णय घेऊन एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला.

प्रमोद जाधव यांनी परभणी येथून थळे यांना बन्सी गव्हाचे बियाणे आणून दिले. दाणा कणसातून बाहेर काढण्यासाठी लागणारी मोगरी हे लाकडी साधन अहमदनगर येथून उपलब्ध करून दिले. शशीकांत थळे यांना प्रमोद जाधव यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये दोन गुंटे क्षेत्रात दोन किलो गव्हाची पेरणी केली. हिवाळ्याच्या हंगामात 15 डिसेंबर रोजी पेरणी करून प्रचंड मेहनत घेतली. मार्चमध्ये गव्हाचे पिक आले. दोन किलो गव्हाच्या पेरणीमधून या शेतकर्‍यांनी 35 किलो गव्हाचे उत्पादन मिळविले. शशीकांत थळे यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

रायगड जिल्ह्यात अनेक शेतकरी वेगवेगळे पीक घेऊन शेती व्यवसायात आपला जम बसवताना दिसत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ते मार्गदशन मिळणेही गरजेचे आहे. शशिकांत थळे यांनी गव्हाच्या शेतीची केलेली पेरणी यशस्वी केली असल्याने इतर शेतकऱ्यांनीही थळे याचा हा प्रयोग अंमलात आणला अलिबागमध्येही गहू पिकाची शेती भविष्यात पाहायला मिळेल.