मंगळावर? लवकरच!

[email protected]

स्पेस एक्स या एलॉन मस्क यांच्या कंपनीने वेगवान रॉकेटद्वारे ग्रहविजय करण्याचा चंग बांधलेला दिसतो. आतापर्यंत ‘मंगळावर जाऊ पण कधी ते निश्चित सांगता येत नाही’ अशा टप्प्यावर असलेल्या ‘स्पेस-एक्स’ने आता ठामपणे बोलायला सुरुवात केली आहे. या कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पूर्वी मेक्सिकोमध्ये जाहीर केलेल्या रॉकेटपेक्षा थोडं छोटं पण तरीही प्रचंड आकाराच्या रॉकेटद्वारा स्पेसशिप पाठवून सात वर्षांत मंगळावर माणूस पाठवण्याची महत्त्वाकांक्षी येजना जाहीर केली आहे. ही केवळ सांगोवांगीची किंवा वायफळ बडबडीची गोष्ट नव्हे. एलॉन मस्क यांनी आपलं मनोगत ऑस्ट्रेलियातील ऍडलेड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोल परिषदेपुढेच मांडले असल्याने त्याची दखल घ्यायला हवी. आतापर्यंत मस्क त्यांच्या या विलक्षण वाटणाऱ्या योजनेबद्दल आत्मविश्वासाने बोलत होते. परंतु या परिषदेत त्यांनी त्यामागे कोणतं अभियांत्रिकी तंत्रज्ञान असणार आहे ते स्पष्ट केले. ‘आम्हाला वाटतं की आम्हाला चांगला मार्ग गवसलाय’ असे ते म्हणतात.

मंगळाकडे माणूस घेऊन जाणारं ‘स्पेस-एक्स’चं रॉकेट नऊ मीटर व्यासाचं असेल गतवर्षी त्यांनी त्याचा व्यास १२ मीटर असणार असं म्हटले होते. त्यात केलेला हा बदल आहे. तरीसुद्धा ते ‘नासा’ने माणूस चंद्रावर पाठवताना वापरलेल्या सॅटर्न-५ या रॉकेटपेक्षा शक्तिशाली असेल. या रॉकेटला ‘बीएफआर’ असे म्हटले जाईल. त्यातील ‘बी’ बिग किंवा प्रचंड अशा अर्थाने आहे. पृथ्वीजवळच्या कक्षेपर्यंत ते १५० मेट्रिक टन वजन उचलून नेऊ शकेल. या रॉकेटद्वारा मंगळावर जाणाऱ्या ‘स्पेसशिप’च्या रचनेविषयीसुद्धा मस्क यांनी सांगितलं. त्यामध्ये ४० केबिन असतील. एका केबिनमध्ये दोन किंवा तीन जणांची राहायची सोय असेल. त्यामुळे किमान शंभर अंतराळ प्रवासी या स्पेसशिपमधून मंगळाकडे उड्डाण करू शकतील. उड्डाणानंतर काही काळात बुस्टर रॉकेट पृथ्वीवरील उड्डाणतळाकडे (लॉन्चिंग पॅड) परत येईल आणि स्पेसशिप मंगळाच्या दिशेने सुसाट जात राहील. मंगळाकडे जाण्याच्या अनेक महिन्यांच्या प्रवासाला पुरेल एवढं मिथेन आणि ऑक्सिजनचं यानात इंधन भरलेलं असेल. मस्क यांची ‘बिग’ रॉकेटची योजना केवळ मंगळ प्रवासापुरती नसून तुलनेने छोटे रॉकेट अंतराळातील पृथ्वीला घातक ठरू शकणारा अवकाशयानांच्या अवशेषांचा ‘कचरा’ नष्ट करायलाही मदत करतील.

मंगळाकडे जाणाऱ्या स्पेसशिपचे आणि ते वाहून नेणाऱ्या रॉकेटचे सर्व भाग पुनःपुन्हा वापरता येण्यासारखे (रियुजेबल) असतील. त्यामुळे प्रवासाचा खर्च कमी होईल. हेच स्पेसशिप चंद्र किंवा अगदी पृथ्वीच्या अन्य भागातही उतरू शकेल. ताशी १८ हजार मैल किंवा २८९६८ किलोमीटर वेगाने उडणाऱ्या या रॉकेटच्या दूरच्या आणि जवळच्या फेऱ्या (ट्रिप) शक्य आहेत. त्याच्या जवळच्या फेरीत ते न्यूयॉर्कच्या प्रवाशांना अवघ्या ३९ मिनिटांत चीनमधल्या शांघाय शहरात पोचवू शकेल. एवढंच नव्हे तर पृथ्वीवरच्या कोणत्याही दोन दूरस्थ बिंदूंमधलं अंतर ‘बीएफआर’ केवळ तासाभरात पार करू शकणार आहे! म्हणजे ‘बुलेट ट्रेन’ किंवा ‘हायपर लूप’ हे पृथ्वीवरचं वेगवान तंत्रज्ञान त्यापुढे काहीच नाही. एलॉन मस्क यांचा उत्साह अमाप आहे. २०२२ मध्ये मंगळाकडे मानवविरहित ‘कार्गो’ यान पाठवून यशस्वी उड्डाणाची चाचणी घेतली जाईल आणि २०२४ मध्ये माणसं मंगळाकडे जायला निघतील. त्यानंतर लवकरच दोन कार्गो आणि दोन ‘स्पेसशिप’मधून सामान आणि माणसांचं मंगळावतरण होईल. येत्या सात वर्षांत हे प्रत्यक्षात आलं तर ती अंतराळ प्रवासातली अपूर्व क्रांती असेल. त्यासाठी एलॉन मस्क यांना ‘यशस्वी भव’ अशा सदिच्छा द्यायला हरकत नाही.