वाघ पाहताना

 भरत जोशी,[email protected]

ताडोबा किंवा कोणत्याही व्याघ्रप्रकल्पात फिरण्याचे, व्याघ्र निरीक्षणाचे काही नियम असतात…

आपल्या हिंदुस्थानात विविध राज्यांतील अभयारण्यात ‘व्याघ्रदर्शनासाठी’ असंख्य पर्यटक भेट देत असतात. प्रत्येक पर्यटक जंगल सफारीचे जीपमध्ये बसण्यापूर्वी, बसल्यावर तसेच टायगर सफारीत जंगलात फेरफटका मारताना, भ्रमंती करताना कमीत कमी चार-पाच वाघ दिसावे, किमानपक्षी एका तरी वाघाचे दर्शन व्हावे या इच्छेने जंगल सफारी करताना पाणवठय़ाजवळ, कुरणाकडील गवताळ भागात आपली भिरभिरती नजर न थकता सतत ठेवत असतो, परंतु बऱयाच वेळा काही अतिउत्साही पर्यटक वनविभागाचा कायदा आणि नियमांचे उल्लंघन करून स्वतःला वाटेल तसे वागतात. आपण कुठे आहोत याचे भान विसरतात आणि अपघाताला सामोरे जातात.

पर्यटकांनी कसे वागावे? आपण कुठे जाणार आहोत, कधी जाणार आहोत, त्या अभयारण्यातील नियम व अटी काय आहेत याचे परिपत्रक वनविभागांकडून घेऊन त्याचा नीट अभ्यास करून व आपली स्वतःची नीट तयारी करून अभयारण्यात ‘जंगल सफारीचे नियोजन’ करावे.

ज्या दिवशी जंगल सफारीला जायचे त्याच्या आदल्या दिवशी कमी आहार घ्यावा आणि लवकर झोपावे. पूर्ण विश्रांती घ्यावी.

आपला ड्रेसकोड कसा असावा? पर्यटकांनी निसर्गाशी साजेशा म्हणजे हिरव्या रंगाचा अगर साधा पोशाख करावा. टोपी आवश्यक असते. आपला मोबाईल, कॅमेरा, पॉवर बँक, व्हिडीओ इत्यादी सर्व पूर्ण चार्ज करून ठेवावेत. मुली व स्त्रियांनी शक्यतो सरवार कुर्ता परिधान करावा.

बरोबर नेण्याचे सामान-साहित्य – शूज, पाण्याची बाटली, हॅण्ड टॉवेल, वेफर्स, बिस्किटे, ड्रायफ्रूटस् यासाठी हॅवरसॅक घ्यावी.

जंगल सफारीला जाताना काय नेऊ नये?

भडक रंगाचा पेहराव नसावा. कॅप लाल रंगाची म्हणजेच भडक रंगाची नसावी. टेपरेकॉर्डर, कुठलेही वाद्य नेऊ नये. मोबाईलमधील गाणी लावू नयेत.

जंगल सफारीच्या वाहनात बसल्यावर बडबड, आरडाओरड, हसत राहणे, आपल्या सफारी जीपमधून पुढच्या किंवा मागील सफारी जीपमधील माणसांशी उगीचच जोरजोरात चर्चा करत बसू नये.

वनविभागाच्या अटी, नियमांचे स्वतः तंतोतंत पालन करून दुसऱयांना प्रवृत्त करणे.

अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्पातील अपघात कसे टाळावेत?

काही अनुभवी पर्यटक अतिउत्साहाने वाघ दिसला की, त्याच्या छायाचित्रणाला सुरुवात करतात. हे जरी स्तुत्य असले तरी काही हौशे, नवशे, गवसे पर्यटक अतिउत्साहात व्याघ्रदर्शन झाले की, गरजेपेक्षा जास्त कासावीस होतात सर्वांची फोटो काढण्यासाठी एकच धडपड एकाच वेळी सुरू होते. जंगलात किंवा पाण्यावर वाघ आणि तिचे छावे बसले आहेत असे पाहून सफारी जीपमधून खाली उतरून वाघिणीजवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि वाघीण तिच्या छाव्यांचे रक्षण करण्यासाठी पर्यटकांवर हल्लाबोल करते. याला जबाबदार पर्यटक असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

कुठल्याही परिस्थितीत आपल्या जंगल सफारी वाहनातून बाहेर पडू नये.

वनविभागाने आखून दिलेल्या नियम व अटी यांच्या ऑफिडेव्हिटवर (प्रतिज्ञापत्र) पर्यटकांची स्वाक्षरी व दिनांक लिहून फॉर्म भरून घ्यावा.

वनविभागातील कायदे व नियमांचे उल्लंघन केले असता दंड आकारण्यात यावा.

वन कर्मचारी, गार्डस् तसेच सफारीच्या वाहनचालकाने स्वतःच्या मर्यादा पाळाव्यात. जंगलात सफारीला जाताना, जंगलात असताना वाहने उगीचच ओव्हरटेक केली जातात. ते टाळावे.

जंगल सफारी वाहनाची स्पीड लॉक करावी. प्रत्येक जंगल सफारी वाहनात प्रथमोपचाराचे साहित्य असावे. वाहनचालक आणि गाईड याला प्रथमोपचाराचे संपूर्ण ज्ञान असावे. रिसेप्शन काऊंटरच्या जागी एक रुग्णवाहिका असणे आवश्यक ठरते.