व्हाईट सॉस इटालियन पास्ता

डॉमिनोज, पिझ्झा हट अशा ठिकाणी मिळणारा व्हाईट सॉस पास्ता बघितला कि तोंडाला पाणी सुटतं. पण या पास्तासाठी मोजावी लागणारी किंमत बघून तोंडाला फेस यायची वेळ येते. छोटय़ाश्या प्लेटमधील पास्ता साठी हे लोकं अक्षरश: २०० ते ३०० रुपये घेतात. पण हा डिलिशियस पास्ता तुम्ही घरातले पदार्थ वापरुन अवघ्या पंधरा ते वीस मिनीटांत बनवू शकता.

साहित्य : एक पाकीट पास्ता, दोन कप दूध, २ मोठे चमचे बटर, ५ ते ६ पाकळ्या लसून (किसून), मिरची पूड किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट, २ क्युब चीझ, मीठ, २ चमचे मैदा, काळीमिरी पूड किंवा मिक्स हर्ब्स.

कृती – पास्ता उकळत्या पाण्यात टाकून चांगला शिजवून घ्यावा. शिजला की एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवावा. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवावी. त्यात बटर टाकावा. बटर वितळला की त्यात किसलेले लसून टाकावे. लसून चांगली परतली की त्यात मैदा घालावा. मैदा चांगला खरपूस भाजावा. रंग बदलू देऊ नये. त्यानंतर हळूहळू दूध घालावे. मैद्याची पेस्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत राहावे. दूधात पास्ता घालावा. पास्ता परतला की वरुन मीठ, काळीमिरी पूड किंवा मिक्स हर्ब्स घालावे. किसलेले चीझ घालावे. पास्ताला उकळी आली कि चीझ वितळून जाईल. आवडीनुसार पास्ता घट्ट किंवा पातळ ठेवावा. गरमा गरम पास्ता सर्व्ह करा.

टिप:

आवडत असल्यास बटरमध्ये कापलेली शिमला मिरची, मशरुमचे तुकडे किंवा शिजवलेले अमेरिकन कॉर्न टाकू शकता. तळलेले पनीरचे तुकडे देखील या पास्तामध्ये अप्रतिम लागतात.

मिक्स हर्ब्स हे हल्ली सहज बाजारात उपलब्ध असतात. तसेच पास्ता सिझनिंगही बाजारात मिळतात त्याचाही वापर करु शकता. हल्ली बाजारात व्हीट पास्ता म्हणजेच गव्हाचा पास्ताही मिळतो.