झेडपीचा अध्यक्ष कोण? १५ जानेवारीला ठरणार

सामना प्रतिनिधी । ठाणे

तब्बल ५५ वर्षांनंतर ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर आता झेडपीचा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही उत्कंठा आता संपणार असून १५ जानेवारी रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात पाचव्यांदा हा मान महिलेला मिळणार आहे. या निवडणुकीमुळे तीन वर्षे सुरू असलेली ठाणे जिल्हा परिषदेवरील प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार आहे.

नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने ५३ पैकी २६ जागा काबीज करीत आपले वर्चस्व निर्माण केले. जिल्हा परिषदेत सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीला १० तर काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली. गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. शिवसेनेच्या विजयामुळे आता तो संपुष्टात आला असून ग्रामीण भागाच्या विकासाचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे. सोमवारी १५ जानेवारी रोजी अध्यक्ष व उपाध्यपदाची निवडणूक होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे.

पंचायत समिती सभापती निवडणूक ८ जानेवारीला
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, कल्याण, मुरबाड, भिवंडी व अंबरनाथ तालुक्यांतील पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक ८ जानेवारी रोजी होणार आहे. सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीपूर्वी ही निवडणूक होत आहे.