कोण होणार कोहली ब्रिगेडचा प्रशिक्षक?

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

शास्त्री किंवा सेहवागचा सहाय्यक होण्यास तयार – प्रसाद

हिंदुस्थान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याच्या वृत्ताचे खंडन करत माजी गोलंदाज प्रसादने आपण सहाय्यक प्रशिक्षक किंवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले होते. या पदासाठी रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अन्य काही जणांनी अर्ज केले आहेत. प्रसाद हा सध्या ज्युनियर संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष आहे. त्याचा तीन वर्षांचा करार सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे.

प्रसाद म्हणाला, की मुख्य प्रशिक्षकपदासाठी मी अर्ज केलेला नाही. हिंदुस्थान क्रिकेटसाठी मी सहाय्यक प्रशिक्षक वा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून योगदान देण्यास तयार आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री वा सेहवाग यांच्यापैकी कोणाचीही नियुक्ती झाली तरी मी त्यांच्यासोबत माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव शेअर करू शकतो. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखालील सल्लागार समिती सहायक वा गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत काय भूमिका घेते माहिती नाही, पण मला हिंदुस्थानी संघासोबत काम करायला नक्कीच आवडेल असेही प्रसादने नमूद केले.

फुलटाइम प्रशिक्षकपद नकोच – कर्स्टन

दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन हे २००८ ते २०११ या काळात हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या काळातच ‘टीम इंडिया’ने २०११ सालचा विश्वचषक जिंकला होता. त्यांच्याच काळात टीम इंडिया कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता. मात्र सध्या कर्स्टन कोहली ब्रिगेडचे फुलटाइम प्रशिक्षक होण्यास इच्छुक दिसत नाही.