एअर इंडियाची शिस्त, कुणी व्याख्या सांगेल काय?

लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा आम्ही तेवढे ‘शाणे’ या स्वप्नरंजनातून नोकरशाही बाहेर पडेल तेवढे बरे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा हे एक सज्जन गृहस्थ आहेत. त्यांच्या शिस्त पर्वाचे आम्ही स्वागत करीत आहोत, पण लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणे हे एअर इंडियाच्या ‘शीएमडी’चे वर्तन शिस्तीच्या कोणत्या चौकटीत बसते? एअर इंडियाच्या शिस्तीची व्याख्या काय? याबाबत संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगितलेत तर बरे होईल!

झोपी  गेलेला जागा झाला व जागा झाल्यावर त्याचा ‘सैराट’ झाला असेच काहीसे आपल्या प्रिय एअर इंडियाच्या बाबतीत झालेले दिसते. विमानखात्याच्या राज्यमंत्र्यांनी आता असे बजावले आहे की, विमानांत बेलगाम वर्तन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री सिन्हा यांच्या इशाऱ्याचे आम्ही स्वागत करीत आहोत. बेशिस्त लोकांना शिस्त लावल्याशिवाय देशाचा गाडा रुळावर येणार नाही व त्यासाठी अनेकदा हाती ‘हंटर’ घेऊनच बसावे लागते, पण शिस्तीच्या बाबतीत आमच्या प्रिय एअर इंडियास जाग आली आहे ती प्रा. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर. गायकवाड प्रकरणात नेमके काय घडले याची रेकॉर्ड वाजवण्यात अर्थ नाही. जणू कश्मीर खोऱ्यात सुरू असलेला पाकड्यांचा दहशतवाद मागे पडावा अशी प्रसिद्धी या प्रकरणास देऊन मीडियाने जो ‘तडका’ लावला तो सर्व प्रकार आश्चर्याचा धक्काच म्हणावा लागेल. इतकी प्रसिद्धी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाला आणि आत्महत्यांना मिळाली असती तर कदाचित राज्यकर्त्यांचे मन द्रवले असते. विमानात बेलगाम वर्तन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील हे बरोबरच. मग फक्त विमानातच कशाला, जमिनीवर का नाही? एखाद्या राज्यात शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास ते राज्य बरखास्त केले जाईल असा इशारा आतापर्यंत दिल्लीश्वरांनी का देऊ नये हा प्रश्न गेली अडीच वर्षे अधांतरीतच अडकून पडला आहे. बरं हे

बेशिस्त वर्तनास लगाम

घालण्याचे प्रयत्न फक्त प्रा. गायकवाडांच्याच बाबतीत का? दोन महिन्यांपूर्वी विजयवाडा विमानतळावर तेलुगू देसमच्या खासदाराने हंगामा केला. डय़ुटी मॅनेजरच्या थोबाडात मारून विमानोड्डाण रोखले. मग हा गायकवाडी बंदी प्रयोग या सन्माननीय खासदारांवर का झाला नाही? नाही म्हणजे कायद्याची व शिस्तीची छडी आपण वाजवलीत म्हणून हे विचारले. ज्या एअर इंडिया व्यवस्थापकीय संचालकांच्या कर्तृत्वाचे पवाडे आता ‘भाट’ मंडळींकडून गायले जात आहेत त्यांनी तरी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. या देशातील सामान्य माणसालाही सन्मानाने वागवायला हवे व लोकप्रतिनिधींनी हे पथ्य सगळ्यात जास्त पाळायला हवे हे आम्हाला एकदम मान्य आहे, पण विजयवाडाप्रकरणी हेच ‘शीएमडी’ मूग गिळून बसतात, कपिल शर्माचा बेवडेबाज धिंगाणा सहन करतात आणि काल-परवा एका तृणमूल खासदाराने केलेले बेशिस्त वर्तनही गिळून टाकतात. तिथे त्यांच्या शिस्तीच्या छडीची धार कमी होते, पण गायकवाड प्रकरणात त्यांचे कर्तव्यदक्ष मन उसळ्या मारते व त्यांचे ‘भाट’ सोशल मीडियावर जणू ‘यासम हाच’ असा आव आणून ‘बच्चे लोग ताली बजाव’चा प्रयोग रचतात. शिस्तीचे भोक्ते आम्हीदेखील आहोत, पण कायदा हा सगळ्यांसाठी समान असावा. चप्पल मारणारा दोषी आहे, पण ज्याचे थोबाड त्या चपलेने फुटले तो तरी खरोखरच संत सज्जन आहे काय याचीही शहानिशा होऊ द्या. राजकारण्यांना एकांगी पद्धतीने झोडपणे ही आता फॅशन झाली आहे. एक यंत्रणा मोडून काढून

यादवी’ निर्माण करण्याचा हा डाव

आहे. एअर इंडियाचे ‘शीएमडी’ महान असतील, त्यांनी वाळवंटात गुलाबाचा बगिचा फुलवला असेल, चंद्रावर जाऊन पाण्याचे झरे शोधले असतील अथवा समुद्राच्या तळाशी जाऊन ‘शेती’चे विक्रमी पीक काढले असेल, पण गायकवाड प्रकरणात त्यांनी जी घिसाडघाई केली त्यावर आम्ही प्रश्न केला तर काय चुकले? विजयवाडा प्रकरणात तुमची हिंमत व एअर इंडिया कर्मचाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे तुमचे धोरण कुठे पंक्चर होऊन पडले? की विमान वाहतूकमंत्री विजयवाड्याचे म्हणून तुमच्या टायरची हवा गेली? त्यामुळे तुमचे ‘शीएमडी’ किती महान व गायकवाड कसे चुकले या वादाचा कीस काढण्यापेक्षा वादावर पडदा टाकून शिस्तीचे नवे पर्व सुरू करावे असेच आम्हाला वाटते. लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा व आम्ही तेवढे ‘शाणे’ या स्वप्नरंजनातून नोकरशाही बाहेर पडेल तेवढे बरे. बेलगाम वर्तन सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून करावी. गायकवाड चुकले असतील तर कायदा त्यांना शिक्षा करील, पण दोन-पाच लोकांची मनमानी म्हणजे कायद्याचे राज्य नसून ती अराजकाची सुरुवात आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा हे एक सज्जन गृहस्थ आहेत. त्यांच्या शिस्त पर्वाचे आम्ही स्वागत करीत आहोत, पण लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणे हे एअर इंडियाच्या ‘शीएमडी’चे वर्तन शिस्तीच्या कोणत्या चौकटीत बसते? एअर इंडियाच्या शिस्तीची व्याख्या काय? याबाबत संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगितलेत तर बरे होईल!

 

  • sac_nair

    Samza, mee hi ekhadya AI chya staff shi vaieet vaaglo, marlo, shivi deto- samza ki kaaran pan Gaikwadan saarkhaach hota- AI ne beshishta pane vaagle maajhya barobar- maajhya kade kasleech chook navhti. Tar mala eka maafi patra nantar sodteel kaa?
    Zar mala hi sodteel tar mag chaan- nasel- mhanje mala police lock up madhe taakteel tar maajhya barobar je zhaala te chook asel kaa?