नवरीचे दागिने हरवले, सगळ्या गावाने मिळून शोधून काढले


सामना ऑनलाईन । मडिकेरी

एखाद्याची मौल्यवान वस्तू हरवली, तर तो काय करेल. पोलिसांत तक्रार करेल आणि स्वतःहून शोध घेण्याचाही प्रयत्न करेल. पण कर्नाटकातल्या एका नवरीचे हरवलेले दागिने सगळ्या गावाने मिळून शोधल्याची घटना घडली आहे.

हट्टीहोले या गावात राहणाऱ्या उमेश शेट्टी यांनी आपली मुलगी कुसुम हिच्या लग्नासाठी दागिने केले होते. कॉफीच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या शेट्टी यांच्या घराच्या परिसरात १६ ऑगस्ट रोजी भूस्खलन झालं आणि त्यांचं संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. त्यात त्यांच्या घरात असलेलं लोखंडी कपाटही त्यात होतं. २६ ऑगस्ट रोजी कुसुम हिचा विवाह असल्याने मुलीला दागिन्यांशिवायच लग्नाला उभं राहावं लागेल, ही भीती शेट्टी यांना सतावत होती. शेट्टी राहतात तो परिसर दुर्गम असल्याने तिथे वाहन पोहोचणं कठीण होतं. त्यामुळे शेट्टी यांच्या मुलीसाठीचे दागिने शोधण्यासाठी सगळा गाव हातात येईल ती वस्तू घेऊन दगड मातीचा भला मोठा ढिगारा उपसू लागला.

पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता असूनही एक संपूर्ण दिवस ढिगारा उपसण्याचं काम सुरू होतं. शेवटी एका स्थानिक आमदाराने दिलेल्या जेसीबीने ढिगारा उपसला गेला आणि लोखंडी कपाट मिळालं. त्यातले दागिने सुस्थितीत असले तरीही लग्नासाठी ठेवलेले पैसे गायब असल्याचं शेट्टी यांचं म्हणणं आहे. सुदैवाने कुसुम हिचा वाग्दत्त वराने समजूतदारपणा दाखवत दागिने मिळोत किंवा न मिळोत, लग्न ठरल्या दिवशीच होईल, असं जाहीर केलं आहे.

summary- whole village dug for lost jewellery