तिरुपतीला केस का वाहतात?


भव्यता आणि सौंदर्य… या दोन गोष्टींमुळे दक्षिणेतील तिरुपती बालाजीचे मंदिर आजही लोकप्रिय आहे. म्हणूनच ते सर्वात श्रीमंत देवस्थान बनले आहे. भाविक श्रद्धेने येथे मोठमोठय़ा दक्षिणा देतात म्हणून ते श्रीमंत झालेय असं म्हटलं जात असलं तरी त्या देवस्थानात आणखीही काही विशेष बाबी आहेत. त्या बाबींमुळेही बालाजी मंदिर देशातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत झाले आहे.

बालाजी मंदिरात डोक्यावरचे केस दान करण्याची पद्धत आहे. याचं कारण असं की तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूंचे एक रूप… ते प्रसन्न झाले की लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते अशी धारणा आहे. जो व्यक्तीआपल्या मनातील सर्व पाप आणि वाईट सवयी येथे सोडून देतो. म्हणून त्याचे सर्व दुःख देवी लक्ष्मी नष्ट करते. केसांच्या रूपाने लोक आपापली पापे येथे सोडून देतात असा समज आहे.

बालाजी मंदिरात भक्तांना तुळशीपत्र दिले जात नाही. वास्तविक भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूला तुळस अत्यंत प्रिय… म्हणूनच तर यांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व आहे. देशातील बहुतांश मंदिरांत देवाला अर्पण करण्यात आलेली तुळशीपत्रे नंतर प्रसाद म्हणून भाविकांना दिली जातात. पण बालाजी मंदिरात तुळस भक्तांना दिली जात नाही. पूजा झाल्यानंतर तुळशी पत्र मंदिराजकळील एक विहिरीत टाकले जाते.

स्वयंभू मूर्ती

तिरुपती बालाजी मंदिराचे आणखी एक महात्म्य म्हणजे ही मूर्ती कुणी प्रतिस्थापित केलेली नाही. ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली आहे. काळ्याभोर रंगाची ही मूर्ती स्वतः प्रकट झाल्यामुळे या मूर्तीला विशेष महत्व दिले जाते. मंदिराचे चौथे वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण मूर्तीचे दर्शन फक्त शुक्रवारीच होते. तसं पाहिलं तर मंदिरात बालाजीचे दर्शन दिवसातून तीनदा होते. सकाळी होते ते पहिले दर्शन. त्याला विश्वरूपदर्शन म्हणतात. दुसरे दर्शन दुपारी होते आणि तिसरे दर्शन रात्री दिले जाते. इतरवेळी या व्यतिरिक्तही दर्शन होते, पण त्यासाठी शुल्क आकारले जाते.