पृथ्वी का तापतेय?

मनीषा सावंत,[email protected]

तप्त उन्हाळा… सहन होत नाही… का वाढतंय जगाचं तापमान…?

माणसाने वर्षानुवर्षे जंगलतोड चालवली आहे, समुद्र बुजवून त्यावर मोठमोठय़ा इमारती बांधायला सुरुवात केली आहे. यामुळे वातावरणात ग्रीनहाऊस गॅस प्रचंड मोठय़ा प्रमाणावर वाढायला लागला आहे. परिणामी पृथ्वीच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. संशोधकांनी म्हटल्यानुसार ग्रीनहाऊस गॅसची ही पातळी गेल्या ६ लाख ५० हजार वर्षांमध्ये वाढली नव्हती तेवढी आता वाढली आहे. याला कारण माणसाने गेल्या काही वर्षांत वातावरणात सोडलेले उष्णताशोषक वायूच असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे. वातावरणातील हे बदल म्हणजेच ‘ग्लोबल वॉर्मिंग’… मराठीत याला ‘जागतिक तापमानवाढ’ म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणात थोडी जरी तापमानवाढ झाली तरी पृथ्वीच्या हवामान चक्राच्या आकृतीबंधावर परिणाम होतो… आणि सध्या झालेला हवामान बदल तर फारच मोठा आहे.

 

शास्त्रीय भाषेत सांगायचे तर सूर्यकिरण पृथ्वीवर पडले की पृथ्वी त्यातली काही उष्णता शोषून घेते. उरलेली उष्णता सुर्यकिरण पृथ्वीवरुन वातावरणाकडे परावर्तित झाले की वातावरणात सोडली जाते. वातावरणामध्ये काही ‘हरितगृह वायू’ सुर्यकिरणांमधली काही उष्णता पकडतात. पृथ्वीवरील परावर्तित सुर्यकिरणांमधील उरलेली उष्णता परत अवकाशात जाते. हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण जेवढे जास्त तेवढी त्यांची पृथ्वीवरील परावर्तित सुर्यकिरणांमधील उष्णता पकडून ठेवण्याची क्षमता जास्त. ओघानेच तेवढी पृथ्वीची जागतिक तापमानवाढ जास्त!

पृथ्वीचे तापमान रोखणे माणसाच्या हातात नाही, पण ते कमी करण्यासाठी आपण धडपडू शकतो. फक्त लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण व्हायला हवी. पृथ्वी खऱया अर्थाने हिरवीगार ठेवली तर पृथ्वीचे हे तापमान बऱयाच अंशी कमी करता येईल. आजच्या काळात या प्रचंड गरमीमुळे वेगवेगळे आजार जडू शकतात. किमान ते होऊ नयेत यासाठी तरी ग्लोबल वॉर्मिंगशी दोन हात करायलाच हवेत. माणसाने पॉवर हाऊस, मोठमोठे कारखाने, धूर सोडणारी वाहने वापरायला सुरुवात केल्यामुळे वातावरणातील हरितगृह वायू प्रचंड वाढला आहे. फक्त पॉवर हाऊस स्टेशन्समुळे वातावरणात २१.३ टक्के उष्णता निर्माण होते असं संशोधक नमूद करतात. मोठय़ा कारखान्यांद्वारे १६.८ टक्के, तर वाहनांच्या प्रदूषणामुळे १४ टक्के गरमी निर्माण हो

नेमके काय कराल?

आपण सर्वसामान्य माणसांनी ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी काही उपाय अंगिकारले पाहिजेत. यात एअर कंडिशनर किंवा कुलिंग मशीन्सचा वापर शक्यतो टाळायला हवा. कारण या उपकरणांतून सीएफसी गॅस जास्त बाहेर फेकला जातो. मोठमोठय़ा कारखान्यांमधील चिमण्यांतून जो धूर बाहेर फेकला जातो तो शरीरासाठी आणि एकूणच वातावरणासाठी मोठा हानिकारक असतो. कारण त्यातून निघणारा कार्बन डाय ऑक्साईड गरमी वाढवतो. मुळातच कारखान्यांमध्ये धूर होणार नाही यासाठी खबरदारी घ्यायला हवी. सरसकट वृक्षतोडही थांबवली पाहिजे. यामुळे जंगलांच्या संरक्षणाला बळ मिळेल. कोळशापासून वीजनिर्मितीपेक्षा सौर ऊर्जेने आणि पाण्याद्वारे विजेची निर्मिती करण्यावर भर द्यायला हवा.