आफ्रिकन देश गलिच्छ, ट्रम्प पुन्हा बडबडले

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आफ्रिकेतील देशांवर वंशवादी टीका करत त्यांना गलिच्छ देश म्हटले आहे. या देशांतील नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याच्या कायदेतज्ज्ञांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे.

गलिच्छ देशातून लोक स्थलांतरित होऊन आपल्या देशात का येतात?, असा सवाल ही ट्रम्प यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. ट्रम्प यांनी आफ्रिकन देश आणि हैतीच्या संदर्भात असे उद्गार काढले आहेत. मात्र त्याच वेळी त्यांनी नॉर्वे सारख्या देशांतील लोकांनी अमेरिकेत यावं, त्यांच स्वागत आहे, असं देखील म्हटलं आहे. नॉर्वे हा पाश्चिमात्य देश असून तो जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला श्रीमंत देश आहे.

आफ्रिकन देशातून स्थलांतरित होणाऱ्या लोकांबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी विशिष्ट वर्णाचे लोक ज्या देशात अधिक आहेत त्या देशातील लोकांसाठी गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. ट्रम्प यांनी अल सल्वाडोरच्या स्थलांतरितांना आता अमेरिकेत राहण्याची परवानगी नाकारली आहे. तसेच सल्वाडॉर वंशाच्या दोन लाख लोकांना अमेरिकेतून बाहेर काढले जात आहे.

ट्रम्प यांनी केलेल्या गलिच्छ टिकेबाबत व्हाईट हाऊसचे प्रवक्ते राज शहा यांना विचारले असता त्यांनी वॉशिंग्टनचे काही नेते इतर देशांसाठी लढत आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच अमेरिकन लोकांसाठी लढणार आहेत. तसेच शहा यांनी इतर देशांप्रमाणे स्थलांतरीत होणाऱ्या लोकांचा देशाला फायदा व्हावा या दृष्टीने विचार केला असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करण्याऱ्या आणि वातावरणाशी समरूप होणाऱ्या लोकांचं अमेरिकेत नेहमीच स्वागत केलं जाईल, असंही स्पष्ट केलं आहे.