हवामान खात्यालाही दंड

177

<<जयराम देवजी>>

यंदा हवामान खात्याने सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.  अर्थात तो राज्यात कशा प्रकारे कोसळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते. दोन पावसांमध्ये दीर्घ  खंड पडला तर दुष्काळजन्य परिस्थिती होऊ शकते. मान्सूनचे आगमन लांबले तरीही दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. हवामान खात्याचा अंदाज चुकला वा मान्सूनच्या लहरीपणामुळे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी हवामान खात्याकडे नसली तरीदेखील शेतकऱ्याला मात्र त्याचा फटका बसतो. मान्सून व्यवस्थित बरसला तर देशाचा आर्थिक विकास दर वाढण्यास मदत होते. शासनाने याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली तरी त्यामध्ये हवामानाचा आणि शेतकऱ्याच्या परिश्रमाचा वाटा असतो. चांगल्या पावसामुळे येणाऱ्या भरघोस पिकाला रास्त भाव मिळण्यासाठीची पद्धती विकसित करणे शासनाचे कर्तव्य आहे. आपल्याकडे मान्सून सुखकारक बरसला आणि मोठय़ा प्रमाणात पीक आले तरीही पुरवठा वाढून बाजारात भाव कोसळतात आणि शेतकरी आर्थिक गर्तेत जातो. शेतकऱ्यांनीही मान्सूनच्या अंदाजावर लक्ष ठेवून पिकांची देखभाल केली पाहिजे. त्याचबरोबर एक पीक पद्धती सोडून मिश्र पीक  पद्धती अवलंबली पाहिजे, तसेच शेतकऱ्यांच्या सर्व कर्जाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी आणि बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ वित्तपुरवठा केला पाहिजे. तसेच उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव देण्याचा कायदा केला पाहिजे. हवामान खात्यालाही अंदाज चुकीचे ठरल्यास दंड आकारण्यात येईल असे सांगण्याची वेळ आली आहे. यासाठी हवामान खात्याचे आधुनिकीकरण गरजेचे आहे. आधुनिकतेच्या आजच्या जगात शेतकऱयाला त्याच्या मोबाईलवर हवामानाची, मान्सूनची सर्व अद्ययावत माहिती उपलब्ध झाली पाहिजे. तरच पावसातील चढ-उतारांमुळे होणारे नुकसान टळू  शकेल आणि चांगल्या सरासरीचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या