माहेरी आलेल्या विधवा महिलेची दरीत उडी मारून आत्महत्या

4

सामना प्रतिनिधी । जामखेड

तालुक्यातील भुतवडा येथील माहेरी आलेल्या विधवा महिलेने जामखेड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सौताडा जिल्हा बीड येथील रामेश्वर कड्यावरून दरीत उडी मारून आत्महत्या केली. दोन महिन्यांपुर्वीच या महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाले होते. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कोमल विजय तानवडे वय २२ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे. मृत कोमल हीचे काही वर्षापूर्वी लग्न होऊन ती वाडेगव्हाण ता. पारनेर या ठिकाणी आपल्या सासरी नांदत होती. मात्र दोन महिन्यांपुर्वी तिच्या पतीचे अपघाती निधन झाले होते. तेव्हा पासून ती अस्वस्थ होती. शनिवारी कोमल कुणालाही काहीही न सांगता घरातुन बाहेर पडली, ती रात्री घरी परत आलीच नाही.

सकाळी तिचा मृतदेह रामेश्वर येथील दरीत आढळुन आला. या वरुन तिने रामेश्वर येथील कड्यावरून दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या नंतर सौताडा येथील ग्रामस्थांच्या मदतीने कोमलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या नंतर पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कोमल हीला एक वर्षांचा मुलगा आहे.

सायंकाळी भुतवडा या ठिकाणी तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमनाथ मोतीराम राळेभात यांनी दिलेल्या माहितीवरून पाटोदा जिल्हा बीड पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.